उस्मानाबाद : शिवसेना जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांना मारहाण झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील बार्शी बायपासवरील पाटील यांच्या घरासमोर घडली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास सुधीर पाटील हे त्यांच्या घरात असताना अचानक बाहेरून एक दगड त्यांच्या घराच्या दारावर आला. यावेळी पाटील यांनी बाहेर येवून तेथे थांबलेल्या युवकांना दगड कोणी मारला, अशी विचारणा केली. यावर दादा ऊर्फ विशाल देशमुख याने पुन्हा त्यांच्या दिशेने दगड भिरकावल्याने या दोघांत बाचाबाची सुरू झाली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी सुधीर पाटील यांचा मुलगा मध्ये पडला. मात्र तेथे जमलेल्या जमावाने सुधीर पाटील व त्यांच्या मुलासही मारहाण केली. तसेच या दोघांच्या अंगावरील ब्रासलेटसह इतर दागिने असा एकूण ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल लंपास केला, अशी फिर्याद सुधीर पाटील यांनी शहर पोलिसात दिली. यावरून सागर देशमुख, दादा ऊर्फ विशाल देशमुख, विजय सोलंकर, अजय सूर्यवंशी, अमित लोमटे, सुमित लोमटे, महेश बागल यांच्यासह इतर दहा ते पंधरा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर शहरातील तांबरी विभागासह बार्शीनाका परिसरातील दुकाने व्यापाऱ्यांनी बंद केली. इतरही काही भागात तणावाचे वातावरण असल्याने पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. (प्रतिनिधी)
शिवसेना जिल्हाप्रमुख पाटील यांना मारहाण
By admin | Updated: March 10, 2016 00:45 IST