उस्मानाबाद : ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या १ हजार ९२ शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्यात आले होते. हा अहवाल शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार जिल्हाभरातील केवळ सातच शाळांना ‘अ’श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे. ही बाब गुणवत्तेच्या दृष्टीकोनातून चिंतेत टाकणारी आहे. घसरलेली गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत पालकातून व्यक्त होत आहे.चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्याला दोन अंकी बेरीज येत नाही, अशी माहिती खुद्द शिक्षण सभापती संजय पाटील दुधगावकर यांनी जि.प. च्या मागील सर्वसाधारण सभेत दिली होती. स्वयंमूल्यमापनातूनही असेच चिंताजनक चित्र समोर आले आहे. जिल्ह्यातील १ हजार ९२ शाळांच्या स्वयंमूल्यमापनाचा अहवाल जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार ७ शाळांनाच ‘अ’ श्रेणीमध्ये स्थान मिळविता आले आहे. तुळजापूर, उस्मानाबाद आणि लोहारा या तालुक्यांना तर भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे संबंधित तालुक्यातील गुरुजी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि विस्ताराधिकारी यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ येवून ठेपली आहे. दिवसेंदिवस इंग्रजी शाळांचे आव्हान अधिक व्यापक होत चालले आहे. वर्षागणिक इंग्रजी शाळांच्या संख्येमध्ये झपाट्याने भर पडत आहे. असे असतानाच दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता खालावत चालली आहे. ही बाब लोकप्रतिनिधीपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आत्मचिंतन करायला लावणारी आहे. उमरगा तालुक्यातील १५१ पैकी २, परंडा तालुक्यातील १३९ पैकी २, भूम तालुक्यातील १२१ पैकी १, वाशी तालुक्यातील ७४ पैकी १ तर कळंब तालुक्यातील १४१ पैकी एकाच शाळेला ‘अ’ श्रेणी मिळू शकली. या उपरोक्त सातही शाळांना ९० ते १०० टक्के दरम्यान गुण प्राप्त झाले आहेत. ‘ब’ श्रेणीत स्थान मिळालेल्या शाळांची संख्याही काही समाधानकारक नाही. गुणवत्ता वाढीसाठी शासनाकडून कोट्यावधी रुपये खर्च केले जात असतानाही गुणवत्तेचा आलेख मात्र वरती जाण्याऐवजी घसरत असताना दिसत आहे. ‘ब’ श्रेणीमध्येही केवळ १२४ शाळा समाविष्ट झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक शाळा या उमरगा तालुक्यातील आहेत. त्यानंतर तुळजापूर आणि कळंब तालुक्यातील प्रत्येकी १४, उस्मानाबाद २४, लोहारा ८, वाशी ३, भूम १३ आणि परंडा तालुक्यातील २३ शाळांचा समावेश आहे. ‘क’ श्रेणीमध्ये ९३४ शाळा समाविष्ट आहेत. या शाळांना ६० ते ७९ टक्के दरम्यान गुण मिळाले आहेत. तर २७ शाळांना ‘ड’ श्रेणी मिळाली. ज्यांना ४० ते ५९ टक्के दरम्यान गुण मिळाले आहेत. हे चित्र बदलण्यासाठी जि.प. कडून जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे पालकांतून बोलले जात आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या सातच शाळांना ‘अ’ श्रेणी
By admin | Updated: August 29, 2014 01:29 IST