अंबाजोगाई: अंबाजोगाई तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्राला दलालांनी मोठ्या प्रमाणात विळखा घातल्याने सामान्य विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. याचा मोठा फटका विद्यार्थी व नागरिकांना सहन करावा लागत आहे. महसूल प्रशासन मात्र हा सर्व प्रकार निमूटपणे पाहत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. सेतू सुविधा केंद्रातून उत्पन्नाचे प्रमाणपत्र नॉन-क्रिमिलेअर, रहिवासी प्रमाणात - उत्पन्नाचे प्रमाणपत्र असे विविध ७० प्रकारचे प्रमाणपत्र या केंद्रातून वितरित केले जातात. कामकाजाची प्रक्रिया सहज व सुलभ व्हावी या उद्देशाने हे केंद्र आहे. मात्र, या केंद्रात असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा परस्परांमध्ये समन्वय नसल्याने व देण्यात येणारी प्रमाणपत्रे ही दलालांची माध्यमातून दिली जात असल्याने याचा मोठा फटका विद्यार्थी व नागरिकांना सहन करावा लागतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लागणारे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. याच संधीचा फायदा तहसील कार्यालयात बसलेली दलाल मंडळी उठवितात. प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा चौपट व पाचपट रक्कम घेऊन ही प्रमाणपत्रे दलालांकडून वितरित होतात. सेतू सुविधा केंद्रात विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी महिला व पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा करून ही सुविधा सुरळीत करावी तसेच विद्यार्थ्यांची वाढती गर्दी असल्यामुळे जादा कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत, अशी मागणी मानवलोक जनसहयोगच्या वतीने करण्यात आली आहे.तहसील परिसरातून दलालांची हकालपट्टी करा - डॉ. द्वारकादास लोहियाअंबाजोगाई तहसील परिसराला दलालांनी घेरले आहे. सामान्य विद्यार्थ्यांना थेट प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी हे विद्यार्थी मजबुरीमुळे दलालांचा आधार घेतात व दलाल त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करतात. यामुळे सामान्य विद्यार्थ्यांची मोठी लूट होत आहे. या दलालांची तहसील परिसरातून हकालपट्टी करावी, अशी मागणी डॉ. द्वारकादास लोहिया, शाम सरवदे, संजना आपेट, सावित्री सागरे यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांना केली आहे.ठोस उपाययोजना आखणार - तहसीलदारसेतू सुविधा कार्यालयातून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्र वितरणासाठी स्वतंत्र नायब तहसीलदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच महिला व पुरुषांची वेगवेगळी रांग तयार करून ही प्रक्रिया सहज व सुलभ व्हावी यासाठी ठोस उपाय योजना आखण्यात आल्या आहेत. विद्यार्थी व नागरिकांनी दलालाकडे न जाता थेट सेतूमधूनच स्वत: प्रमाणपत्र घ्यावीत, असे आवाहन तहसीलदार राहुल पाटील यांनी केले आहे. दरम्यान, सेतू सुविधा केंद्रामध्ये अधिकाऱ्यांना हाताशी धरुन विद्यार्थ्यांची लूट केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
सेतू सुविधा केंद्र दलालांच्या विळख्यात
By admin | Updated: July 4, 2014 00:13 IST