उस्मानाबाद : निराधारांच्या पगारातून ‘सीबीएस’साठी दहा आणि सेवाशुल्क म्हणून ७ रूपये असे १७ रूपये कपात करण्याचा निर्णय २०१३ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनीच घेतला होता. तेव्हा दुधगावकरांचा शेतकऱ्यांविषयीचा कळवळा कुठे गेला होता? असा सवाल जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केला. हा सर्व खटाटोप शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर प्रसिद्धीसाठीेचा स्टंट असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी मंगळवारी जिल्हा बँकेसमोर धरणे आंदोलन करीत, सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यावर बुधवारी बँकचे चेअरमन सुरेश बिराजदार यांनी सर्व आरोपांचे खंडण करीत दुधगावकर यांचे आंदोलन स्टंटबाजी असल्याचे म्हटले आहे. निराधारांच्या पगारीतून १७ रूपये कपात करण्याचा निर्णय का घेतला? कपात केलेल्या रकमेचे काय झाले? याचा जाब तत्कालीन सत्ताधाऱ्यांना विचारावा, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला. बँकेला उर्जितावस्था मिळावी, यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील तसेच संचालक मंडळ सातत्याने प्रयत्न करीत आहे. असे असतानाच व्यक्तीद्वेषातून विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. त्यामुळे आमच्या प्रयत्नांना खिळ बसत असल्याचे नमूद करीत, अनेक राष्ट्रीयकृत बँका तीन महिने झाले असतानाही शेतकऱ्यांना खरीप अनुदानाची रक्कम देत नाहीत. तसेच अनुदानातून कर्जासोबतच व्याजाची रक्कमही कपात करीत आहेत. असे असतानाही जिल्हा बँकेच्या विरोधात आंदोलन करणारे दुधगावकर या बँकाबाबत गप्प का? असा सवालही देशमुख यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)
सेवाशुल्क म्हणून ७ १७ रूपये कपात करण्याचा निर्णय
By admin | Updated: March 10, 2016 00:43 IST