जालना : भूसंपादित जमिनीचा वाढीव मावेजा न दिल्याने लघुपाटबंधारे विभागाच्या विविध कार्यालयातील जप्तीची प्रक्रिया सुरूच असून गुरूवारी लघुपाटबंधारे स्थानिक स्तर या कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीसह विविध साहित्याची जप्ती करण्यात आली.घनसावंगी तालुक्यातील मानेपुरी येथील शेतकरी हरदास वामनराव वाघ यांची शेतजमीन गट क्रमांक १०५ मध्ये क्षेत्र १ हेक्टर १६ आर ही शासनाने २००५ मध्ये कोल्हापुरी पाझर तलावासाठी संपादित केली होती. जमिनीचा वाढीव मावेजा मिळावा, यासाठी हरदास वाघ यांनी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर जालना येथे दावा दाखल केला होता.सदर प्रकरणाचा निकाल २० आॅगस्ट २०१३ रोजी झाला. २ लाख ६४० रुपये व त्यावरील व्याज असे एकूण ६ लाख ७७ हजार ६९१ रुपये द्यावेत, असे आदेश न्यायालयाने दिले. शासनाने ही रक्कम दिली नाही, म्हणून न्यायालयाने लघुपाटबंधारे स्थानिक स्तर कार्यालयातील साहित्याच्या जप्तीचे आदेश दिले. त्यानुसार गुरूवारी वाघ यांच्यासह त्यांचे वकील अॅड. राजेश वाघ व अॅड. रामकृष्ण बनकर यांनी बेलिफांसह कार्यालयात जाऊन जप्तीची कार्यवाही केली.यामध्ये कार्यकारी अभियंता यांच्या खुर्चीसह इतर पाच खुर्च्या, १ कुलर, झेरॉक्स मशीन, २ संगणक, २ सीपीयू, लेझरजेंट प्रिंटर या साहित्याचा समावेश आहे.यावेळी बेलिफ वैष्णव, सरवदे, त्रिमल, अॅड. श्रीराम हुसे यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत देशपांडे यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
लघुपाटबंधारे स्थानिक स्तर कार्यालयातही जप्ती
By admin | Updated: April 17, 2015 00:38 IST