जालना : नगर पालिकेची कोट्यवधी रूपयांची थकबाकी मालमत्ताधारकांकडे आहे. पालिकेकडून वारंवार सूचना तसेच पत्रव्यवहार करूनही नागरिक थकबाकी भरण्यास तयार नाहीत. मोठ्या थकबाकीदारांची मालमत्ता पालिका विशेष अधिकार वापरून स्वत:च्या नावे करणार आहे.जालना शहरात नगर पालिकेची विविध प्रकाराचे कर मिळून ६० कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे. यात प्रामुख्याने घर तसेच नळपट्टी त्यासोबतच इतर करांचाही समावेश आहे. गत काही महिन्यांतच कर वसुली वाढावी म्हणून नगर पालिकेने विशेष पथक स्थापन्यासह अनेक मोहिमा राबविल्या मात्र यात थकबाकीदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. ११ महिन्यांत ८ कोटी ३५ लाखांची वसुली झाली. याची टक्केवारी फक्त ४६ टक्के एवढी आहे. वसुलीचे प्रमाण वाढावे म्हणून कर विभागात वारंवार अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. मुख्याधिकारी पुजारी वारंवार बैठका घेतात. सूचना करतात. प्रत्यक्षात वसुलीचा आकडा वाढत नाही. थकबाकीदार प्रतिसाद देत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. घर तसेच नळपट्टी सोबतच शिक्षण कर, वृक्षकर, पर्यावरण कर आदी आठ ते दहा प्रकाराच्या करांची वसुली होते. लाखोंत असणारी थकबाकी आज कोटीत गेली आहे. काही दिवसांपूर्वी नगर पालिकेने मोठ्या थकबाकीदारांची नावे असलेल्या जाहिरातीही प्रसिद्ध केल्या होत्या. असे असतानाही वसुलीत कोणतीही वाढ झाली नाही. महिनाभरात तीस ते चाळीस कर्मचारी फक्त २५ ते ३० लाखांची वसुली करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.याविषयी नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी म्हणाले, कर वसुली तीव्र करण्यात आली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पालिका मालमत्ता जप्त करत.मालमत्ता जप्तीलाही थकबाकीदार जुमानत नाही. त्यामुळे पालिका विशेष अधिकार वापरून संबंधिम थकबाकीदाराची मालमत्ता पालिकेच्या नावावर करणार असल्याचे पुजारी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणार
By admin | Updated: March 29, 2016 00:37 IST