कोरोना संकट टळेना: विठ्ठल भक्त व वारकऱ्यांच्या आनंदावर विरजण
कोरोना संकट टळेना : विठ्ठल भक्त व वारकऱ्यांच्या आनंदावर विरजण
वाळूज महानगर : कोरोनाच्या संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी छोट्या पंढरपुरातील आषाढी यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रा रद्द झाल्यामुळे लाखो विठ्ठल भक्त व वारकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
पंढरपुरात दरवर्षी आषाढी यात्रेनिमित्त लाखो भाविकांची श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी उसळत असते. या यात्रेसाठी जिल्हा तसे परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दिंड्या घेऊन वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी छोट्या पंढरपुरात येत असतात. गतवर्षी कोरोनाच्या संकटामुळे आषाढी यात्रा रद्द करण्यात आली होती. या वर्षीही कोरोनाचे संकट टळलेले नसल्यामुळे शासनाच्यावतीने यात्रा, उत्सव व धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातलेली आहे. पोलीस प्रशासनाकडून आषाढी यात्रेसाठी परवानगी नाकारण्यात आल्यामुळे विश्वस्त मंडळाने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वस्त मंडळाच्यावतीने कोरोना नियमांचे पालन करून मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत महाभिषेक, महापूजा व आरती आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पवार व पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे. कोरोनाच्या संकटामुळे आषाढी यात्रा रद्द झाली असली तरी विश्वस्त मंडळाच्यावतीने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, श्री विठ्ठल व रूक्मिणी यांच्या मूर्तीची स्वच्छता, मंदिर परिसराची स्वच्छता आदी कामे सुरू आहेत.