जालना : बदनापूर तालुक्यातील निकळक येथील शेतकऱ्याची एक हेक्टर जमीन पाझर तलावासाठी संपादित करण्यात आली होती. दहा वर्षे उलटल्यानंतरही संबंधित शेतकऱ्यास जमिनीचा मावेजा न मिळाल्याने न्यायालयाचा आदेशाने जालना एसडीएमची खूर्ची तसेच इतर साहित्य शुक्रवारी जप्त करण्यात आले.निकळक येथील शेतकरी बद्री रंगनाथ वाघ यांची गट क्रमांक २०१ मधील १ हेक्टर २० आर एवढी जमीन महाराष्ट्र शासनाने २००५ मध्ये पाझर तलावासाठी संपादित केली होती. या जमिनीचा मावेजा मिळावा म्हणून वाघ यांनी भूसंपादन १८ क अधिनियम कलम १८ खाली २००६ मध्ये अॅड. रामकृष्ण बनकर व अॅड. राजेश वाघ यांच्या मार्फत न्यायालयात दावा दाखल केला होता. सदर प्रकरणाचा निकाल २८ फेब्रुवारी २०१२ रोजी बद्रीनाथ वाघ यांच्याकडून लागला. सदर दाव्याची अंमलबजावणी करण्यासाठी ३ लाख ४७ हजार ३९० चा दावा सन २०१२ प्रतिवादी विरोधात दाखल केला होता. विद्यामान दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जयश्री परदेशी यांनी प्रतिवादी विरोधात जप्तीचे आदेश दिले. त्या आदेशान्वये उपविभागीय अधिकारी श्रीकार चिंचकर यांची खूर्ची, ७ संगणक, पंखे, सात प्रिंटर, २५ खुर्च्या जप्त करण्यात आल्या.
मावेजाप्रकरणी जालना एसडीएमची खूर्ची जप्त
By admin | Updated: March 19, 2016 00:44 IST