दोन शैक्षणिक सत्रांपासून अनुदानित व विनाअनुदानित मराठी व हिंदी माध्यमांच्या शाळांना विद्यार्थी पटसंख्या टिकवणे मोठे आव्हानात्मक झाले आहे. ३० सप्टेंबरची पटसंख्या गृहीत धरून संच मान्यता प्रक्रिया राबविली जात असते; परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बहुतांश कामगार मजूर वर्ग मूळगावी स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे विशेषतः हिंदी माध्यमाच्या शाळांसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या शहरातील या शाळा विद्यार्थ्यांच्या शोधामध्ये असून, विविध वसाहतींमध्ये शिक्षक सर्वेक्षण करून विद्यार्थी प्रवेशासाठी प्रयत्न करीत आहेत. एका वर्गात किमान तीस विद्यार्थी असणे अपेक्षित असते. त्यावर शिक्षकांची पदे अवलंबून असतात. तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे म्हटले जाते.त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवितात की नाही याबाबत संभ्रमावस्था असल्याने यावर्षीही संच मान्यता करू नये असे मत शैक्षणिक वर्तुळात व्यक्त केले जात आहे.
पदे टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शोधात शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:04 IST