परभणी : मानवत तालुक्यातील कोल्हा येथील जि़प़ शाळेत तब्बल एक वर्षांपासून इंग्रजी विषयाच्या शिक्षकाचे पद रिक्त आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांनी सीईओंच्या दालनात २३ सप्टेंबर रोजी शाळा भरविली़ यामुळे जि़प़ परिसर विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीने दणाणून गेला़ कोल्हा येथील जि़प़ शाळेत शिक्षक एस़एस़ चिद्रवार यांची मुळ अस्थापना होती; परंतु, शासनाच्या आदेशानुसार त्यांना एक वर्षाच्या ट्रेनिंगसाठी पाठविण्यात आले होते़ ट्रेनिंग संपताच त्यांना मुळ अस्थापना असलेल्या कोल्हा जि़प़ शाळेवर नेमणूक करण्याऐवजी त्यांची नेमणूक रामपुरी येथे प्राथमिक पदवीधर म्हणून करण्यात आली़ त्यामुळे या शाळेतील पद रिक्त राहिले़ तसेच पदवीधरांच्या तीन जागा रिक्त आहेत़ त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़ शिक्षकांच्या नियुक्त्या कराव्यात म्हणून मंगळवारी विद्यार्थी व ग्रामस्थांनी सीईओंच्या दालनामध्ये शाळा भरवून आंदोलन केले़ यावेळी शिक्षणाधिकारी आठवले यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले़ निवेदनावर सरपंच श्रीनिवास तारे, तुकाराम भिसे, दत्तराव राऊत, सुरेश हारकळ, बाबासाहेब गरड, कारभारी ठाकरगे, सुंदर तारे, प्रकाश राऊत, राजेभाऊ देशमुख, बाबासाहेब गरड, लक्ष्मण देशमुख, महादेव मोरे, लक्ष्मण तुकाराम देशमुख, ज्ञानेश्वर तारे, तिडके, दिगंबर भिसे, शंकर भिसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत़ (प्रतिनिधी)
सीईओंच्या दालनात शाळा
By admin | Updated: September 23, 2014 23:22 IST