राम शिनगारे
औरंगाबाद : कोविडच्या भीतीमुळे १६ मार्च २०२० पासून शाळा बंदच आहेत. आणखी किती दिवस शाळा उघडणार नाहीत याविषयी साशंकता आहे. या शाळांवर अवलंबून असलेल्या स्कूल बस मागील १६ महिन्यांत पार्किंगमधून बाहेर पडल्या नसल्याची माहिती अनेक बसमालकांनी लोकमतला दिली. शहरातील एकूण ९६३ शाळांमध्ये ११२५ स्कूल धावतात. यातील बहुतांश बस पार्किंगमध्येच असल्याचे पाहणीत आढळून आले आहे.
कोविड-१९ च्या साथीला १६ मार्च २०२० पासून सुरुवात झाली होती. तेव्हा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा करतानाच शाळाही बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शाळांमध्ये घेऊन जाणाऱ्या स्कूल बस जागेवरच थांबल्या आहेत. या बस तेव्हापासून अद्याप सुरू झालेल्या नाहीत. स्कूल बसची संख्या अधिक असल्यामुळे त्यांना इतरत्रही कोणते काम मिळाले नाही. तसेच स्कूल बसमध्ये विद्यार्थ्यांच्या उंचीप्रमाणे सीट बसविण्यात आलेल्या असतात. त्यामुळे या बसचा इतर ठिकाणी उपयोगही होत नसल्याची माहिती बसमालकांनी दिली.
शहरातील एकूण शाळा : ९६३
स्कूल बस : ११२५
प्रतिक्रिया
फक्त तीन हप्ते फेडले
शहरातील पोदार, अनंत भालेराव, चाटेसह इतर शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पाच बस गाड्या घेतल्या होत्या. यातील दोन गाड्यांचे हप्ते सुरू आहेत. सुरुवातीआ तीन हप्ते चुकते केले. त्यानंतर पैसे नसल्यामुळे आतापर्यंत एकही हप्ता दिला नाही. बँकवाले दोनवेळा येऊन गेले. त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली. त्यानंतर आलेच नाहीत. पाचही गाड्या पार्किंगमध्ये लावलेल्या आहेत. त्या अद्याप बाहेर काढल्या नाहीत.
- मच्छिंद्रनाथ कोटीये, बस मालक
-----------------------------------------
मिळेल ते काम करतो
शाळा बंद झाल्यापासून दोन स्कूल बस बंद आहेत. स्कूल बसही घरासमोर उभ्या आहेत. त्यामुळे घर चालविणेही अवघड बनले आहे. काय करावे हे कळत नाही. शाळा कधी सुरू होणार याविषयी कल्पना नाही. सगळे अंधकारमय झाले आहे. त्यामुळे मिळेल ते काम करीत असतो. बदली ड्रायव्हर म्हणून अनेक गाड्यांवरही जात आहे.
- सदाशिव गोरे, बस मालक
चालकांच्या प्रतिक्रिया
उपासमार सुरू आहे
४ महिन्यांपासून स्कूल बस बंद आहेत. त्यामुळे हाताला काहीही काम नाही. उपासमार सुरू आहे. कारखान्यांमध्ये काम करणे शक्य नाही. त्यामुळे कधी चहा विकत होतो, पण तेही करता येत नाही.
- अरविंद जाधव, स्कूल बसचालक
----------------------------------------
रिक्षा सुरू केली
शाळा बंद असल्यामुळे स्कूल बस सुरू नाहीत. त्यामुळे मुलांना सोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे शहरात रिक्षा चालवित आहे. त्यातही उत्पन्न मिळत नाही. पण त्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही. मिळेल त्यावर गुजराण सुरू आहे.
- प्रकाश तरटे, स्कूल बसचालक