उस्मानाबाद : केंद्र शासनाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता़ मात्र, चार जिल्ह्यातील ५ हजार ३०३ विद्यार्थ्यांचे अर्ज संबधित महाविद्यालयांनी अद्यापही समाजकल्याण विभागाकडे पाठविले नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकडे महाविद्यालयच कानाडोळा करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांमधून केला जात आहे.अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार केंद्रशासनाने विहित केलेल्या दराने निर्वाह भत्ता तसेच कनिष्ठ/वरिष्ठ महाविद्यालयाने शिष्यवृत्ती, शिक्षण फीस, परिक्षा फीस वितरित करण्यासाठी ‘इ-शिष्यवृत्ती’ योजना कार्यान्वित केली. मात्र, विद्यार्थ्यांच्या हिताच्या या योजनेला महाविद्यालयांच्या उदासीन धोरणामुळे खिळ बसत असल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीत लातूर जिल्ह्यातील २ हजार ९४२, उस्मानाबाद जिल्ह्यातील २७८, नांदेड २ हजार तर हिंगोली जिल्ह्यातील ८३ असे चार जिल्ह्यातील एकूण ५ हजार ३०३ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती केवळ महाविद्यलयांकडून समाजकल्याण विभागाकडे अर्ज दाखल झाले नसल्याने रखडली असल्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अनिल शेंदारकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
महाविद्यालयांमुळे रखडली शिष्यवृत्ती
By admin | Updated: August 7, 2014 02:05 IST