औरंगाबाद : जुन्या शहरासह वाढीव हद्दीचा विकास आराखडा एकत्र तयार करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार विकास आराखडा तयार करताना सिडको झालर क्षेत्रातून वगळण्यात आलेल्या सातारा व देवळाई भागाचा विकास आराखड्यात समावेश करण्यात यावा, अशी मागणी आ. प्रदीप जैस्वाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहराच्या वाढीव हद्दीच्या विकास आराखड्याचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. न्यायालयाने जुने शहर व वाढीव हद्दीचा विकास आराखडा एकत्र करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विकास आराखडा तयार करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात जैस्वाल यांनी नमूद केले आहे की, सिडको झालर क्षेत्रातून वगळून सातारा व देवळाईचा समावेश महापालिकेत करण्यात आला. सातारा-देवळाई भागाचे विकास नियोजन सिडको नियोजन प्राधिकरणाच्या झालर क्षेत्र विभागाअंतर्गत करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, हा विकास योजना नकाशा अद्याप पूर्णत्वास आलेला नाही. काही क्षेत्राची सुनावणी व अंतिम निर्णय बाकी आहे. त्यामुळे शहर, वाढीव हद्द व सातारा देवळाई या तीनही भागांसाठी नियोजन प्राधिकरण म्हणून, पुणे येथील नगररचना संचालकांकडे जबाबदारी सोपवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.