तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) झोपडपट्टी भागात गेल्या १० दिवसांपासून कांजण्या रोगाची २० जणांना लागण झाली असून, २ ते १२ वयोगटातील बालके या आजाराने त्रस्त झाली असून, दहा ते बारा चिमुकले खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.सांगवी झोपडपट्टी वस्तीत दोनशेपेक्षा अधिक नागरिक राहतात. येथे मागील १० दिवसांपासून कांजण्या रोगाची लागण झाली आहे. प्रथम ताप येणे नंतर अंगावर पूरळ उटणे अशी रोगाची लक्षणे आहेत. या रोगाने निकीता बागल (वय ७), नवनाथ मगर (वय २३), अभिजीत मगर (वय ११), संकेत मगर (वय ८), मुस्कान शेख (वय ११), अपसना शेख (वय १२), अन्वर शेख (वय ९), स्वाती मगर (वय ७), निता मगर (वय ९), सरस्वती मगर (वय ९), औदुंबर मगर (वय ४), लक्ष्मी (वय १५), वैष्णवी पवार (वय १३ महिने) यांना ग्रासले आहे. जवळपास १० ते १२ जणांवर खासगी दवाखान्यात उपचार घेतले आहेत. कांजण्यामुळे मागील दहा दिवसापासून नागरिक त्रस्त असतानाही आरोग्य विभागाचे अधिकारी या परिसरात फिरकलेले नव्हते. दरम्यान, मंगळवारी या रोगाची लागवण झाल्याची माहिती सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कळताच वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.जी. मोरे यांनी झोपडपट्टी भागात भेट देवून लागण झालेल्या रुग्णांना औषधे गोळ्या दिल्या. तर आरोग्य सेविका काळे, आरोग्यसेवक धोत्रे यांनी मंगळवारी याबाबत माहिती घेवून लहान बालकांची काळजी घेण्याबाबत मातांना मार्गदर्शन केले. (वार्ताहर)
कांजण्याच्या साथीने सांगवी काटीचे चिमुकले त्रस्त
By admin | Updated: January 14, 2015 00:56 IST