भोकरदन : वाळुची तस्करी कोणाच्या लक्षात येणार नाही अशी युक्ती करून तस्कराने अवैध वाळू भरून ट्रक घेऊन जात असल्याचे तहसिलदार मुकेश कांबळे यांच्या लक्षात येताच कांबळे यांनी गाडी थांबवून ताडपतरी बाजुला करून तपासली. त्यामध्ये वाळु असल्याचे आढळल्याने ट्रक पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला आहे़भोकरदन तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात अवैध वाळुची तस्करी होत असून, महसूल व पोलिस प्रशासनाने वाळू तस्कर आणत असलेल्या दबावामुळे नांग्या टाकल्या आहेत. मात्र, तालुक्यातून वाळू औरंगाबाद शहरात नेण्यासाठी वाळू तस्करानी युक्ती शोधली आहे. तडेगाव, वालसा वडाळा, केदारखेडा, हासनाबाद या भागातील पुर्णा, गिरजा नदीच्या पात्रातुन जे़सी़बीच्या सहाय्याने माल वाहतूक करणाऱ्या दहा ते बारा ट्रक व टिप्पर हा गोरखधंदा करीत आहेत. ट्रक रात्रीच्या वेळी नदीकाठावर साठविलेल्या वाळुच्या ठिकाणी येतो व एक तासामध्ये जे़सी़बी च्या सहाय्याने ट्रक भरून त्यावर ताडपत्री लावून बंद करून सरळ औरंगाबाद, सिल्लोड या भागात विक्रीसाठी जातो. १४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान तहसिलदार मुकेश कांबळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीला सुरूवात करण्यासाठी जात असताना त्यांच्यासमोरून ताडपत्री लावलेला ट्रक (एम एच -२० सीटी-२७०७) चालला होता. मात्र या ट्रकबाबत कांबळे यांना शंका आल्याने त्यांनी पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांना ट्रक थांबविण्याची सूचना केली. रेंगे यांनी ट्रक पंचायत समितीच्या प्रांगणात उभी केली. त्यानंतर तपासणी केली असता ट्रकमध्ये ९ ब्रॉस वाळू भरलेली आढळून आली.
वाळू माफियाच्या युक्तीचा तहसीलदाराने केला भांडाफोड..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 01:50 IST