वैजापूर : कोणत्याही प्रकारचा वाळूचा लिलाव न होता गोदावरी व शिवना नदीपात्रातून रात्रंदिवस वाळू उपसा होत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे, वाळूमाफियांवर कारवाई करण्याऐवजी महसूल व पोलीस प्रशानस गप्प का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वैजापूर तालूक्यात सद्या वाळूमाफीयांचा गोरखधंदा जोमाने सुरू आहे. शिवना व गोदावरी नदीपात्राची चाळणी केली जात असून वाळूची विक्री चढ्या भावाने होऊ लागली आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांसह ग्राहकांची चांगलीच लूट होत आहे. त्यात वाळूमाफियांची मात्र चांदी होत आहे. तर शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडविला जात आहे.
शिऊर हद्दीतील झोलेगावमधील लासूरगाव व खापरखेडा व विरगाव हद्दीतील भालगाव डाग, पिंपळगाव येथील गोदावरी पात्रातून बीनधास्त वाळू उपसा होत आहे. वैजापूर तालुक्यातील अवलगाव येथे हंगामी वाळू उपसा करणारे व्यावसायिक आता अवैधरित्या बाराही महिने वाळू उपसा करून लागले आहेत. हे करताना त्यांच्यावर वरदहस्त नेमका कोणाचा आहे, याबद्दल तालूक्यात चर्चा रगलेली आहे.
गोदावरी नदीवरील बंधारे अद्याप भरलेले नाहीत. त्यामुळे शनिदेव, बाजाठाण. हमरापूर, अवलगावपर्यंत वाळू उपसा सुरू आहे. अवलगाव येथील नदीपात्रातूल ट्रॅक्टरने व खानापूरच्या बाजूने ट्रॅक्टरचे टायर लावून बैलगाडीने वाळू उपसा करून रात्रीच्या वेळेला वाळू साठा करण्याचे काम जोमाने सुरू आहे. तालूक्यातील नदीपात्राचा अद्यापही लिलाव झालेला नाही. तरी देखील राजरोसपणे व रात्रीच्या वेळेला वाळूचा गोरखधंदा सुरू आहे. यात काही गावपुढार्यांचा व पक्षसंघटनेच्या पदाधिकार्यांचा देखील समावेश असल्याचे विशेष सुत्रांनी सांगीतले.
------
रात्रीस खेळ चाले...!
नदीपात्रातील पाणी कमी होऊ लागल्याने वाळूचा साठा उघड़ा पडू लागला आहे. त्याकडे वाळू माफियांचे लक्ष लागलेले आहे. मुळात गोदावरी पात्रातील वाळूला मागणी असल्याने मागेल ती किंमत मिळू शकते. त्यामुळे सावखेडगंगा, बाभूळगाव येथून वैजापूर मार्गे रात्री वाळू वाहतूक होऊ लागली आहे. तसेच झोलेगाव, लासूरगाव, खापरखेडा येथून तर बाराही महिने वाळूचा उपसा होतोच कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अर्थात तालूक्यातील नदीपात्रालगत गावातून वाळू चोरीचा रात्रीस खेळ सुरू आहे. त्यावर कारवाई झालीच पाहीजे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.
---------------
फोटो कॅप्शन : वैजापूर तालुक्यातील शिवना नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्याने खड्डे पडलेले आहेत.