औरंगाबाद : घाटी रुग्णालयासाठी स्पेशलिस्ट डाॅक्टरांसह विविध पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यासाठी तीन दिवस मुलाखती घेण्यात येत आहेत. स्पेशलिस्ट डॉक्टरांना प्रतिमहिना सव्वा लाख रुपये वेतन देण्यात येणार आहे. या वेतनात स्पेशलिस्ट डॉक्टर रूजू होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने घाटीवर रुग्णसंख्येचा भार दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे स्पेशलिस्ट डॉक्टर, स्टाफ नर्स आणि अन्य कर्मचारी अपुरे पडत आहेत. त्यामुळे घाटी प्रशासनाने इंटेसिव्हिस्ट, अॅनेथिसिस्ट, जनरल फिजिशियन, चेस्ट फिजिशियन यांची प्रत्येकी १० पदे, स्टाफ नर्सची १०० पदे आणि विविध संवर्गातील कर्मचारी अशी एकूण १७७ पदे तीन महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपात थेट मुलाखातीद्वारे भरण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक १२ एप्रिल, १६ एप्रिल आणि २० एप्रिल रोजी यासाठी मुलाखती होणार आहेत. स्पेशालिस्ट डॉक्टरांना खासगी रुग्णालयात अधिक वेतन दिले जाते. परंतु, शासकीय रुग्णालयात सेवा बजावणे, हा अनुभवही अधिक महत्त्वपूर्ण ठरतो. त्यामुळे घाटीत रूजू होण्यास स्पेशालिस्ट डॉक्टर कितपत इच्छुक आहेत, हे लवकरच स्पष्ट होईल.
कर्मचाऱ्यांवरील ताण होणार कमी
सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर विशेषत: परिचारिकांवर रुग्णसेवेचा भार वाढला आहे. स्टाफ नर्सची १०० पदे भरली जाणार आहे. त्यामुळे किमान काही प्रमाणात रुग्णसेवेचा ताण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.