गेवराई : शहरात सात वर्षीय मुलीच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर आता शहरासह परिसरात अफवांचे पीक उतू आले आहे. यामुळे पालकांमध्ये भिती पसरली आहे. या धास्तीने काही पालक आपल्या मुलांना शाळेत सोडावयास स्वत:च जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेवराई शहरातील चिंतेश्वर गल्ली येथील इशा मोरया ही सात वर्षीय मुलगी शनिवारपासून गायब होती. या मुलीचा मृतदेह सोमवारी चिंतेश्वर मंदिर परिसरात अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. ही घटना नरबळी असल्याचे येथील नागरिक चर्चा करीत आहेत. अद्याप या प्रकरणातील आरोपींचा पोलीस शोध घेत असले तरी शहरासह परिसरात आता अफवांचे पीक पसरू लागले आहे. शहरासह परिसरात अफवा झपाट्याने पसरत आहेत. यास मोबाईलही कारणीभूत ठरत आहेत. शहरातील इस्लामपूरा भागात सोमवारी एक मनोरुग्ण महिला फिरताना नागरिकांपा आढळून आली. यानंतर तेथील नागरिकांनी सदरील महिलेस पोलीसांच्या ताब्यात दिले. ही घटना खरी असली तरी, या घटनेनंतर पुन्हा एक बाई दोन मुलांना घेऊन जात असल्याची अफवा शहरभर पसरली. यानंतर लगेच अनेक नागरिकांनी एकमेकांना फोन करून विचारले की, महिला कोण होती? कोणाच्या मुलांना घेऊन चालली होती? तिला पोलीसांच्या ताब्यात दिले का? असे एक ना अनेक प्रश्न एकमेकांना फोनवरून विचारले जात होते. ही घटना नंतर केवळ अफवाच असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. मात्र, तोपर्यंत अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. गेवराई शहरासह परिसरातील ग्रामस्थांमध्ये अजुनही भितीचे वातावरण आहे. इशा मोरया खून प्रकरणातील गूढ उलगडत नसल्याने अफवांमध्ये वाढ होत आहे. या अफवांविषयी शहरातील महिला रस्त्या-रस्त्यावर चर्चा करताना दिसून येत आहेत. अफवांमुळे पालकांमध्ये सर्वाधिक भीती असल्याचे दिसून येत आहे. अनेक पालक आपल्या पाल्याला शाळेत ने-आण करीत आहेत. यासाठी अनेकांनी ठरावीक रिक्षाचालकांना सांगितले आहे. मात्र, असे असले तरी नसता धोका नको म्हणून ने-आण करण्याचे काम पालक स्वत:च करीत आहेत. (वार्ताहर)अफवांवर विश्वास ठेवू नकागेवराई शहरासह परिसरातील अफवांविषयी गेवराई ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शेख चॉँद म्हणाले की, इशा मोरया खून प्रकरणी पोलीस शोध घेत आहेत. आरोपी पकडल्यानंतर घटना कशामुळे घडली हे समोर येईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवाही पसरवू नयेत. काही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांना कळवावे असे आवाहनही शेख यांनी केले.अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करागेवराई शहरात सध्या विनाकारण अफवा पसविण्यात येत आहेत. अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईची मागणी अजय दाभाडे, याहीया खान, अक्षय पवार यांनी केली आहे.
गेवराई परिसरात अफवांचे पीक
By admin | Updated: July 4, 2014 00:13 IST