बीड : वडवणी तालुक्यातील रुई येथील ग्रामस्थांना माळीणच्या पुनरावृत्तीची भीती जाणवू लागली आहे़ या ग्रामस्थांचे पुनर्वसन चक्क भुसभुशीत डोंगराच्या पायथ्याशी करण्यात आल्याने येथील नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत़ प्रशासनाच्या या अविचारी धोरणाविरोधात शनिवारपासून ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे़रुई येथील अपर कुंडलिका प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू आहे़ हा प्रकल्प बनविण्यासाठी शेतकऱ्यांकडून दोन हजार एकर जमीन शासनाने संपादित केली़ मात्र या शेतकऱ्यांसाठी साधी दहा एकर जमीन पुनवर्सनासाठी देण्याची माणूसकीही प्रशासनाने दाखविलेली नाही़ कुंडलिकेची धार कोंडल्यामुळे रुई गावाला पाण्याने वेढले आहे़ त्यामुळे येथे जीवित व वित्त हानी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे़या पाण्यामुळे सुमारे १० ते १५ गावांचा संपर्क तुटला आहे़ प्रशासनाने गावांमध्ये जाऊन येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन गावातलगत असणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी केले आहे़ मात्र ही जागा असुरक्षित असल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे़ पहिल्याच पावसात हा डोंगर कोसळला असल्याचे माजी आ़ केशव आंधळे यांनी सांगितले़प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्याअगोदर येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन करणे अपेक्षित होते़ मात्र असे न करता प्रशासनाने आपला मनमानी कारभार चालविला असल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे़ एक हजार लोकसंख्या असलेल्या गावाला केवळ ६२ पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहेत़ अनेकांनी स्वच्छेने पुनर्वसन केले़ याच्या निषेधार्थ व सुरक्षित जागेत पुनर्वसन करावे या मागणीसाठी शनिवारपासून येथील शेकडो ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केल्याचे उपसरपंच संजय आंधळे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
रुईकरांना भीती 'माळीण'च्या पुनरावृत्तीची !
By admin | Updated: August 31, 2014 01:10 IST