जालना : जिल्ह्यास मराठवाड्यात उत्पादित होणाऱ्या रेशीम कोषाला स्थानिक खुली बाजारपेठ मिळावी म्हणून चार आॅक्टोबर रोजी औरंगाबाद येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. या मार्केटसाठी सहकार व वस्त्रोद्योग मंत्रालयाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ५ कोटी ८२ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या मार्केटसाठी निधी मंजूर झाल्याने कामाचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. जालना शहरानजिक असलेल्या शिरसवाडी शिवारात दोन हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यात असलेल्या बाजारपेठेच्या धरतीवरच ही बाजारपेठ असणार आहे. तुती उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना ज्या काही सुविधा पाहिजे त्या या ठिकाणी पुरविण्यात येणार आहे. येथे तांत्रिक तसेच कुशल मनुष्यबळ येथे असणार आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष विक्रीसाठी जालना हे मध्यवर्ती ठिकाण आहे. शेतकऱ्यांना व रिलिंग उद्योजकांना कोष खरेदी विक्रीसाठी सोयीस्कर आहे. येथील एकाच मार्केटमध्ये कोष व सूत खरेदी विक्री करण्याची सुविधा असणार आहे. मार्केट निर्मितीमुळे रेशीम लागवड क्षेत्रातही वाढ होण्याचा अंदाज रेशीम अधिकारी व्यक्त करतात. शेतकऱ्यांनीही या पिकाला प्राधान्य दिल्याने तुती (रेशीम) क्षेत्र वाढले आहे. याचा विचार करता शासनाने शेतकऱ्यांना कर्नाटकऐवजी स्थानिक बाजारपेठ व तांत्रिक माहिती उपलब्ध होण्याकरिता जालना येथे रेशीम कोष खुल्या बाजारपेठेला औरंगाबाद येथील बैठकीत मान्यता दिली. या बाजारपेठेचा जालना सोबतच तब्बल दहा हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ३ हजार ९०० एकर तुतीचे क्षेत्र आहे. यात ३ हजार ४०० शेतकऱ्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. बाजारपेठेत अधिकारी, कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी, प्रयोगशाळा, कोष सुरेक्षसाठी विशेष व्यवस्था तसेच कोष सुकविण्याची तांत्रिक व्यवस्था असणार आहे. रेशीम कोषच्या प्रतवारीनुसार शेतकऱ्यांना भाव मिळेल. बाजारपेठेत आॅनलाईन मार्केटिंगची सुविधा असल्याने शेतकऱ्यांना कर्नाटकात काय भाव सुरू आहे, याची अद्ययावत माहिती मिळेल. शीम कोष विक्री बाजारपेठेसोबतच धागा निर्मितीलाही चालना मिळणार आहे. बिगर रेशीम शेतकरी अथवा अन्य धागा निर्मितीलाही चालना मिळणार आहे.
रेशीम मार्केटसाठी पाच कोटी ८२ लाखांचा निधी मंजूर
By admin | Updated: November 4, 2016 00:21 IST