लासूर स्टेशन ही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मोठी बाजारपेठ आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, किराणा, कपडा दुकान, बांधकाम साहित्याची दुकाने आदी विविध साहित्याची बाजारपेठ असल्याने येथे जिल्हाभरातून नागरिक खरेदी-विक्रीसाठी येतात. येथील देवगाव ते कायगाव रस्ता बाजारपेठेतून जातो. यामुळे या रस्त्यावरून दुचाकीसह इतर अवजड वाहने ये-जा करतात. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. दोन महिन्यांपूर्वी आनंद दिघे चौक येथून सिमेंट रस्त्याचे काम सुरू झाले होते. मात्र, ठेकेदार व शासकीय अभियंत्यांच्या मिलीभगतमुळे हे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते. ठेकेदाराने रस्त्याच्या एका बाजूने दोन पट्ट्या सिमेंट रस्ता करून काम बंद केले. ते काम अद्यापही सुरू झाले नसल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ठेकेदारावर मेहरनजर असल्यामुळेच या रस्त्याचे हाल झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
लासूर स्टेशन मुख्य बाजारपेठेतील रस्ता काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:07 IST