खुलताबाद : तालुक्यात शुक्रवारी २५ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी आज वेरूळ, कसाबखेडा, गल्लेबोरगाव येथे पथसंचलन केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांनी दिली.
खुलताबाद तालुक्यातील ३९ पैकी २५ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, निवडणुकीचा प्रचार बुधवार, १३ रोजी सायंकाळी पाच वाजता संपणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाच्या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक होत असलेल्या २५ ग्रामपंचायतींच्या हद्दीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी एक उपविभागीय पोलीस अधिकारी, एक पोलीस निरीक्षक, पाच उपनिरीक्षक, ८५ पोलीस, ५० गृहरक्षक दलाचे जवान नियुक्त करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटलांची बैठक घेण्यात आली. प्रत्येक गावात भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
फोटोकँप्शन : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेरूळ, गल्लेबोरगाव, कसाबखेडा येथे पोलिसांनी पथसंचलन केले.