जालना : जुना जालना भागातील इतवारा मोहल्ला भागातील मुख्य रस्ताच गायब झाला आहे. या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. कचेरी रोडपासून इतवारा भागाकडे जाणारा मुख्य रस्ता १२ मीटरचा आहे. सदरील रस्त्यावर जागोजागी अतिक्रमणे आहेत. कुणी ओट्यांचे बांधकाम तर कुणी कम्पाउंड करून रस्त्याचा भाग कमी केला आहे. परिणामी या रस्त्यावर सुरळीत वाहतूक होण्यासही अडचणी निर्माण होत आहेत. विशेषत: चारचाकी वाहने या रस्त्यावरून नेताना मोठी कसरत करावी लागते. कचेरी रोडपासून सुरू होणारा हा १२ मीटरचा रस्ता कुच्चरओटा भागाकडे जातो. परंतु मध्येच या रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ताच बंद केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. काही दिवसांपूर्वी या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले. मात्र ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे, तो भाग या सिमेंटीकरणातून सुटला. त्यामुळे येथील रहिवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. याबाबत मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांच्याशी संपर्क साधला असता, स्वच्छता निरीक्षकांकडून याबाबतची तपासणी करून अहवाल मागविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदरील अतिक्रमण धारकावर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
अतिक्रमणामुळे रस्ताच झाला गायब !
By admin | Updated: May 21, 2014 00:19 IST