नांदेड : रस्ता सुरक्षा अभियान पंधरवड्याचा रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून मोटर वाहन रॅलीने प्रारंभ झाला. २५ जानेवारीपर्यंत चालणार्या या अभियानात जिल्हाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी धीरजकुमार, पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया यांच्या हस्ते वाहन रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे, मनपा उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांची उपस्थिती होती. रस्ता सुरक्षा अभियानात वाहनचालक मालक मेळावा, चौकसभा, मोफत वायू प्रदूषण तपासणी, विशेष वाहन तपासणी मोहीम, शालेय विद्यार्थ्यांसाठी वाहतूक शिस्त प्रबोधनाचे कार्यक्रम, वाहनांना रिफ्लेक्टीव्हज बसविणे, वाहन चालकांची नेत्रतपासणी, स्कूल बस चालक-मालक मेळावा, बैलगाड्यांसह ट्रॅक्टर, ट्रॉलीज यांना रेडीयम पट्टय़ा लावणे, निबंध व चित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीत विविध मोटार ड्रायव्हिंग स्कुल्सची ३0 हून अधिक वाहने सहभागी झाली होती. /(प्रतिनिधी)
रस्ता सुरक्षा अभियानाला वाहन रॅलीने सुरुवात
By admin | Updated: January 12, 2015 14:30 IST