करमाड : यंदा पावसळ्यात मुख्य महामार्गासह गावखेड्यातील रस्त्याची पूर्णपणे चाळणी झाली असून, जालना महामार्गावरही राजमाता जिजाऊ चौक केम्ब्रिज ते चिकलठाणापर्यंत सहा महिन्यांपासून खड्डेच खड्डे पडले आहेत.
पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहारात मराठवाडा, विदर्भातून येणाऱ्या पर्यटकांचे शहरात प्रवेश करताच गेल्या सहा महिन्यांपासून खड्ड्याने स्वागत होत आहे. महामार्गावर मोठमोठ्या खड्ड्यामुळे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून, केम्ब्रिज ते चिकलठाणा हा रस्ता धोकादायक बनला आहे. रस्ता शहरात येणारा मुख्य रस्ता व महामार्ग असूनही संबंधित विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
दीड किलोमीटर रस्ता खराब
आम्हाला किराणा, दूध अशा जीवनावश्यक वस्तूंसाठी सलग चिकलठाणला जावे लागते. पावसाळ्यानंतर जवळपास दीड किलोमीटर रस्ता अत्यंत खराब झाला असून चिकलठाणला जाताना जालना रोडवरील खड्ड्यांमुळे प्रचंड मनस्ताप होत, वाहनांचे नुकसान होत. वयस्कर मंडळींना मणक्याचे त्रास होतात. सलग सहा महिने जालना रोडवर कधीच खड्डे राहिले नाही. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ दुरुस्ती करावी.
- रवी शिरसाठ, ( सुंदरवाडी)
मनस्ताप...
-पावसाळ्यात अनेक वेळा रस्ता खराब होतो; परंतु पावसाळा संपला की त्याची दुरुस्ती केल्या जाते; परंतु हे पहिले वर्ष आहे की, केम्ब्रिज चौकातून चिकलठाण्याकडे जातानाच जालना रोडवर अपघाताच्या भीतीने अत्यंत कमी वेगाने गाडी चालवावी लागते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन मनस्ताप सहन करावा लागतो.
- बद्री शिंदे, (झाल्टा)