दुधड : करमाड ते लाडसावंगी हा पंधरा किलोमीटर लांबीचा रस्ता मृत्युचा सापळा बनला आहे. जागोजागी खड्डे पडल्याने खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे पडले असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या रस्त्यावरून समृद्धी महामार्गाच्या कामासाठी जाणाऱ्या जड वाहनांची वर्दळ वाढल्याने हा रस्ता खचला जात आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस अपघात सत्र वाढू लागले आहे.
करमाड ते लाडसावंगी दरम्यान दुधड ते लहुकी फाटा हा तीन किलोमीटर रस्ता पूर्णपणे उखडला गेला आहे. एक ते दोन फूट जागोजागी खड्डे पडले आहेत. याबाबत समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माहिती देऊनही या रस्त्याच्या कामाबाबत हलगर्जीपणा केला जात आहे. या मार्गावरून समृद्धी महामार्गाला लागणारा मुरुम, सिमेंट, दगड, लोखंड आदी साहित्य घेऊन जाणारी अवजड वाहनांची वर्दळ मुख्य डोकेदुखी बनली आहे. परिणामी छोट्या वाहनधारकांना येथून जाताना जीवघेणा खेळ करावा लागत आहे.
---------
अपघात सत्र थांबेना
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शनिवारी भांबर्डा गावातील मच्छिन्द्र दिवटे हे दुचाकीवरून करमाडकडे जात होते. जागोजागी खड्ड्यांमुळे वाहन नेमके कसे चालवावे याची चिंता राहते. एक खड्डा चुकविला तरी दुसरा खड्डा हा समोर येतोच. असा जीवघेणा प्रवास करताना अखेर दिवटे यांची गाडी मोठ्या खड्ड्यात आदळली. अन दुचाकीवरील दिवटे दाम्पत्य जमिनीवर कोसळले. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. तर पिंपळखुटा येथील पतीपत्नीचा देखील याच रस्त्यावर अपघात झाला. अपघाताच्या अशा घटना सातत्याने घडू लागल्या आहेत.
---------
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
करमाड ते लाडसावंगी दरम्यानचा रस्ता हा मृत्युचा सापळा बनला आहे. याबाबत नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारीही केल्या आहेत. तरी देखील बांधकाम विभागाने याकडे कानाडोळा केला आहे. कधी तरी समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदारांकडून खड्ड्यांमध्ये माती टाकली जाते. परंतु दोन तीन दिवसात पुन्हा अवजड वाहनांमुळे रस्त्यावरील खड्डे उघडे पडतात. बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम त्वरित करावे, अशी मागणी हभप रावसाहेब महाराज फुकटे, शेषराव दौंड, भिमराव पठाडे, साईनाथ काळे, रामलाल साळुंके, गणेश फुकटे, दुधड, पिंपळखुटा, मुरुमखेडा येथील नागरिकांनी केली आहे.
फोटो :
) करमाड ते लाडसावंगी रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात भांबर्डा येथील दुचाकीस्वार पडून गंभीर जखमी झाला.
२) रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात लाल कपडा बांधून वाहनधारकांना सावध करतांना भांबर्डा येथील नागरिक.