औरंगाबाद : १०० रुपयांत लोडिंग रिक्षा भरून मेथी, पालकाच्या भाज्या विक्रेत्यांनी खरेदी केल्या, असे वाचल्यावर आपणास आश्चर्य वाटेल; पण हे सत्य आहे. पालेभाज्यांची आवक एवढी वाढली की, मातीमोल दरात त्या विकताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात मंगळवारी पालेभाज्यांची एवढी आवक वाढली की, ५० पैशांत मेथीची गड्डी विकणे शेतकऱ्यास भाग पडले. पिसादेवी येथील रामेश्वर मोहिते या शेतकऱ्याने मेथीच्या १,३०० गड्ड्या अवघ्या १०० रुपयांत विकल्या. या ढिगाऱ्याने एक लोडिंग रिक्षा भरली. विक्रेत्याने शंभराची नोट हातात दिली तेव्हा मोहिते यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. मोहिते यांच्यासारखे असे ७० पेक्षा अधिक शेतकरी होते की, त्यांना मातीमोल भावात पालेभाज्या विकाव्या लागल्या.
१०० रुपयांत रिक्षाभर भाज्या
By admin | Updated: January 7, 2015 01:06 IST