उस्मानाबाद : सध्या समाजात आर्थिक दरी वाढत आहे. वाटेल त्या मार्गाने धनसंपदा प्राप्त करण्याचा प्रयत्न एक वर्ग करीत असतानाच दुसरीकडे गरीब कुटुंबाला दोनवेळचे पुरेसे अन्न मिळणे कठीण होत आहे. ही विदारक आर्थिक दरी कमी करण्यासाठी युवा पिढीने स्वातंत्र्यासाठी झगडलेल्या क्रांतीकारकांच्या इतिहासातून प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांनी केले.येथील व्याख्यानमाला संयोजन समितीच्या वतीने ‘आझादी के दिवाने’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. दुर्गमहर्षी मांडे म्हणाले की, देशाचा स्वातंत्र्य लढा शांती आणि क्रांती या दोन मार्गाने लढला गेला. दोन्ही मार्ग वेगवेगळे असले तरी ध्येय मात्र एकच होते. त्यामुळे या वादात न अडकता हा इतिहास युवा पिढीसमोर ठेवणे गरजेचे होते. लढ्यातील थोर पुरूषांनी कसे योगदान दिले. किती हालअपेष्टा सहन केल्या. हाच इतिहास आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. क्रांतीच्या मार्गाने अनेकांनी लढा दिला. शहिद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, अशफल्ला खान आदींनी शत्रूला सळो की पळो करून सोडले. चंद्रशेखर आझाद यांचा इतिहास आजच्या युवा पिढीला निस्वार्थपणा काय असतो, हे दाखवून देईल, असेही ते म्हणाले.स्वत:च्या कार्यामुळे कुटूंबाला त्रास होवू नये, यासाठी कुटूंबाला न सांगताच आझाद घराबाहेर पडले. मुंबईत काही दिवस गोदीमध्ये काम केले. तेथेही मन रमले नाही. अखेर स्वातंत्र्य लढ्यात उडी घेवून त्यांनी सवंगड्यांना एकत्र केले. स्वातंत्र्य लढ्यात उतरल्याने इंग्रज अधिकाऱ्यांच्या भितीने आझादांच्या सवंगड्यांना कोणीही जवळ करीत नव्हते. इंग्रजांशी लढण्यासाठी शस्त्रांची गरज भासत होती. त्यासाठी उत्तर प्रदेशात काकोरी येथे जावून खजिना लूटला. इंग्रज सरकारही या क्रांतिकारकांच्या फळीला घाबरले होते, असे मांडे म्हणाले. यावेळी मांडे यांनी जालियनवाला बाग हत्त्याकांडाचा बदला घेण्यासाठी उधमसिंंगाने इंग्लडमध्ये जावून कशाप्रकारे ओरडवायरचा खून केला, याचा इतिहास छायाचित्राच्या माध्यमातून मांडला. प्रास्ताविक अनंत आडसूळ, सूत्रसंचालन अग्निवेश शिंदे यांनी तर आभार रवींद्र केसकर यांनी मानले. (प्रतिनिधी)
क्रांतीकारकांचा इतिहास प्रेरणादायी
By admin | Updated: March 22, 2016 01:14 IST