लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दौरा तर आयोजित केला मात्र या आढाव्यात दोन आमदारांना एन्ट्री न दिल्याने त्यांना जड मनाने माघारी परतावे लागले. शेवटी त्यांनी आम्हाला निमंत्रणच नव्हते, असे सांगून वेळ मारून नेली.साधारणपणे पालकमंत्री असो वा इतर कोणीही मंत्री आला की, आमदार मंडळींनाही आढावा बैठकीत सहभागी करून घेतले जाते. आज हिंगोलीत दोन-दोन मंत्री होते. पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या कार्यक्रमाची रुपरेषा मात्र वेगळी होती. रामदास कदम यांनी अधिकाऱ्यांचा आढावा किंवा बैठक असे काहीच ठेवले नव्हते. पक्षीय पातळीवर मात्र त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. विश्रामगृहावरच त्यांनी हे कार्यक्रम आटोपले अन् निघून गेले. मात्र आमदारांना जिल्हा कचेरीतून बैठकीचे निमंत्रण गेले होते. पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी ११ वाजता आढावा बैठक ठेवली होती. तर ते स्वत:च नेहमीप्रमाणे उशिराने म्हणजे १ वाजता आले. आज दुसरा शनिवार असल्याने सुटीवर पाणी फेरून हजर झालेल्या अधिकाऱ्यांना थेट आढावा होईल, असे वाटले. मात्र त्यांनी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या कक्षातच अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली. तेथून आढावा घेतला तर जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सर्व विभागांचे अधिकारी तसेच सत्ताधारी आ.तान्हाजी मुटकुळे, आ.संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी आ.गजानन घुगे आदी हजर असल्याचे त्यांना समजले. मग त्यांनी त्या सभागृहात न जाता जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच आरोग्य विभागाचा आढावा घेतला. नंतर खालच्या सभागृहात जाऊन एकेका विभागाचा आढावा घेण्यास प्रारंभ केला. यात महसूल, गृह, जि. प., कृषी या विभागांचाच आढावा साडेचार वाजेपर्यंत चालला. त्यानंतर इतरही विभागांच्या अधिकाऱ्यांना तसेच एकेकाने बोलावले. त्यात साडेसहा वाजून गेले होते. त्यामुळे सभागृहात बसलेल्या अधिकाऱ्यांत कुरबूर ऐकायला मिळत होती. काही तर भुकेने व्याकुळले होते.प्रत्येक दौऱ्यात पालकमंत्री कोट्यवधींच्या कामांची आश्वासने देतात, घोषणा होतात. अधिकाऱ्यांना कामे करण्याची तंबी देतात, प्रत्यक्षात होत काहीच नाही. विरोधकांच्या हाती आयते कोलीत तेवढे मिळते. त्यामुळे यावेळी त्यांनी बैठकच गोपनीयपणे घेत या सगळ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. तर लवकरच याचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे.
आमदारांविना पालकमंत्र्यांचा आढावा
By admin | Updated: June 10, 2017 23:38 IST