उस्मानाबाद : जिल्हा महसूल अधिकारी, कर्मचारी संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी मागील पाच दिवसापासून संप केला आहे. मंगळवारी या आंदोलनात तहसिलदार, नायब तहसिलदारांनीही उडी घेतल्याने जिल्हाभरातील प्रशासन ठप्प झाले आहे. ग्रामिण भागातील हजारो नागरिक, विद्यार्थी आपल्या विविध कामासाठी तहसिल कचेरीत आले होते. कार्यालयाला टाळे पाहून त्यांची निराशा झाली. दरम्यान, हजारावर विद्यार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे सेतु सुविधा केंद्रात अडकल्याने या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी ताटकळावे लागत आहे.नायब तहसिलदारांना ग्रेड-पे वाढवून रुपये ४६०० रुपये करावा, महसूल विभागातील लिपीकाचे पदनाम बदलून त्याला महसूल सहाय्यक असे पदनाम द्यावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या एका मुलाला खात्यामध्ये नौकरीसाठी सहानुभूतीपुर्वक विचार करावा, महसूल विभागातील नायब तहसिलदार संवर्गातील सर्व पदे पदोन्नतीने भरावीत या व इतर मागण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १ आॅगष्टपासून हे बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. मंगळवारी जिल्ह्यातील तहसिलदार व नायब तहसिलदारांनी या पाठिंबा देत या आंदोलनात उडी घेतल्याने जिल्हाभरातील प्रशासन ठप्प झाल्याचे चित्र होते. संपामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे नविन अर्ज स्वीकारण्याचे काम रखडले आहे. मागील सहा महिन्यांपासून रेशन दुकानावर साखर नव्हती. सध्या साखर आली आहे. परंतू महसुल अधिकारी संपावर गेल्याने पुढील प्रक्रिया रखडली आहे. जीवनदायी योजनेच्या कार्ड वाटपालाही या संपाचा फटका सोसावा लागला आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचार घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात सद्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. अनेक विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील विविध सेतु सुविधा केंद्राकडे प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्याची दिनांक पोचपावतीवर देण्यात आली आहे. त्यानुसार मंगळवारी अनेक विद्यार्थी जिल्ह्यातील तहसिल कार्यालयाबाहेर जमले होते. मात्र संपामुळे या विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळू शकली नाहीत. या विद्यार्थ्यांना मुदतीत प्रमाणपत्र सादर करता न आल्यास त्यांना महाव्यिालयीन प्रवेशापासून वंचित रहावे लागण्याची भिती अनेक विद्यार्थी व्यक्त करीत होते.
महसूलचा संप सर्वसामान्यांच्या मुळावर
By admin | Updated: August 6, 2014 02:30 IST