उस्मानाबाद : शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना सहावीच्या वर्गातील श्वेता शरद मुंडे या विद्यार्थिनीला सोन्याची अंगठी सापडली. ती अंगठी तिने आईला दाखविल्यानंतर मंगळवारी पालकासोबत शाळेत जावून ती उपमुख्याध्यापकाकडे परत केली. तिच्या या प्रामाणिकपणाचे गुरुजनांनी कौतुक केले.शहरातील छत्रपती हायस्कूलमध्ये श्वेता शरद मुंडे ही विद्यार्थिनी सहावीच्या वर्गामध्ये शिकत आहे. शनिवारी शाळा सुटल्यानंतर ती मैत्रिणींसोबत घराकडे परतत असताना शाळेच्या आवारात तिला अंगठी सापडली. सदरील अंगठी सोन्याची आहे की बनावट, याबाबत तिला कल्पना नव्हती. सदरील अंगठी घेवून ती घरी आल्यानंतर याची कल्पना आई-वडिलांना दिली. पालकांनी पाहिल्यानंतर सदरील अंगठी सोन्याची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी शाळेच्या उपमुख्याध्यापकांना याची कल्पना दिली. मात्र अंगठी हरवल्याबाबत उपमुख्याध्यापकांकडेही कोणाची तक्रार आलेली नव्हती. त्यानंतर रविवारी श्वेता आणि तिचे वडील शरद मुंडे यांनी शाळेमध्ये जावून उपमुख्याध्यापक पी. एस. चव्हाण यांच्याकडे सदरील सोन्याची अंगठी सुपूर्द केली. यावेळी एम. डी. देशमुख, धनंजय पाटील यांची उपस्थिती होती. श्वेताच्या प्रामाणिकपणाबद्दल गुरुजनांनी कौतुक केले. (वार्ताहर)
सापडलेली सोन्याची अंगठी केली परत
By admin | Updated: September 24, 2014 00:45 IST