पंकज कुलकर्णी, जालना लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या अभुतपूर्व यशाचे साद-पडसाद होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही उमटतील, असे चित्र आहे. या मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ. कल्याण काळे यांचा खा. दानवे यांच्या विरूद्धच्या तुल्यबळ लढतीत अवघ्या ८ हजार ४८२ एवढ्या अल्पमतांनी पराभव झाला होता. त्या निसटत्या पराभवाचा काँग्रेसजन या निवडणुकीतून बदला घेतील, असे अपेक्षित होते. दुर्दैवाने या निवडणुका काँग्रेसजनांनी या भागात फारशा गांभीर्याने घेतल्या नाहीत. मुळात उमेदवार ठरविण्यातच काँग्रेसजनांनी मोठा वेळ खर्ची केला. त्यानंतरच मोर्चेबांधणी सुरू झाली. नवख्या औताडे यांना जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात स्वत:च्या परिचयासह सदिच्छा भेटीतच वेळ गेला. सुदैवाने औताडे यांनी अल्पावधीतच ‘ग्रीप’ घेतली. प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध राळ उडवून धमाल उडविली. तुल्यबळ लढतीचे चित्र उभे केले. वरकरणी महायुतीपेक्षा आघाडीच सर्वार्थाने ‘स्ट्राँग’ असतानाच आघाडीचाच घात झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार सत्तेवर असतांना, जालना, भोकरदन, सिल्लोड, पैठण या चार पालिका आघाडीच्या ताब्यात असतांना आघाडीवर पराभवाची नामुष्की ओढवली. मोदी लाट हे त्याचे एकमेव कारण आहे. त्या लाटेत सत्तारूढ गटाचे मातब्बर पूर्णत: निष्प्रभ ठरले. हे वास्तव आहे. सर्वदूरच लाटेत काँग्रेसजन भुईसपाट झाले, आपले काय? असे लंगडे समर्थन या भागातील लोकप्रतिनिधींकडून केले जाईल. लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे स्वरूप वेगळे आहे, असेही दावे होतील. परंतु आमदार कैलास गोरंट्याल यांच्या जालन्यात, आ. अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड, आ. कल्याण काळे यांच्या फुलंब्री, आ. संजय वाकचौरे यांच्या पैठण व आ. चंद्रकांत दानवे यांच्या भोकरदन या बालेकिल्ल्यात आघाडीचीच झालेली दाणादाण निश्चितपणे धडकी भरणारी आहे. या धक्कादायक निकालातून काँग्रेसजन काय बोध घेतील? हा भाग निराळा. बदनापूरने युतीस नेहमीच कौल दिला. मुळात हा युतीचाच बालेकिल्ला. याहीवेळी सर्वाधिक मताधिक्य देऊन बदनापूरने युतीच्या आशा उंचावल्या. पैठणमधून लोकसभेस सातत्याने महायुतीस कौल मिळाला. मात्र, विधानसभेत राष्ट्रवादीने बाजी मारली. यावेळीचे मताधिक्य राष्ट्रवादीस धास्तावणारे आहे. आ. कल्याण काळे यांच्या फुलंब्रीच्या बालेकिल्ल्यास आघाडीने पुन्हा सुरुंग लावला. ३३ हजाराचे मताधिक्य पटकावले. तिच बाब काळेंना चिंतेची आहे. पालिकेत आ. अब्दुल सत्तार यांनी एक हाती सत्ता मिळविली. मात्र, आपल्याच सिल्लोड या बालेकिल्ल्यात ते आघाडीस तारू शकले नाहीत. गेल्या निवडणुकीत आघाडीस मताधिक्य दिलेल्या जालन्याने यावेळी महायुतीमागे भक्कम समर्थन उभे केले. ते आ. कैलास गोरंट्याल यांना खटकणारे आहे. आ. चंद्रकांत दानवे यांनी आघाडीस तर खा. दानवे यांनी स्वत:स सर्वाधिक मताधिक्याच्या वल्गना केल्या. त्या फोल ठरल्या.
विधानसभेवर होणार परिणाम!
By admin | Updated: May 18, 2014 00:50 IST