लातूर : लातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ त्यामुळे नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी लातूर मनपाच्या आयुक्तांसह जिल्ह्यातील चार नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत़ बांधकामावर पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो़ त्यामुळे पाणीटंचाई अधिक जाणवेल़ त्यासाठी बांधकाम परवाने देणे स्थगित करावेत, असे या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे़ जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत आटले आहेत़ पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, असे असतानाही शहरांत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत़ या बांधकामावर मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते़ परिणामी पाणी टंचाई अधिक वाढते़ त्यामुळे येत्या पावसाळ्यापर्यंत बांधकाम परवाने देण्यात येऊ नयेत़ शिवाय, ज्या ठिकाणी बांधकामे चालू आहेत, तेही थांबविण्यात यावेत़ सुचना देऊनही बांधकामे सुरुच राहिले तर संबंधीतावर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असेही या आदेशात जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी म्हटले आहे़ लातूर मनपाचे आयुक्त, उदगीर, औसा, निलंगा आणि अहमदपूर नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनाही हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत़ पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे़ सध्या पाणीटंचाईवर उपाययोजना सुरु असून अधिग्रहण करणे, नव्या विंधन विहरी व विहिरी घेणे तसेच जिथे गरज आहे, तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे़ टंचाईच्या स्थितीत बांधकामावर पाणी वाया घालवणे योग्य नाही़ (प्रतिनिधी)
पाणीटंचाईमुळे बांधकामांवर निर्बंध
By admin | Updated: January 7, 2015 01:01 IST