औरंगाबाद: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशानुसार, ५ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत ‘ब्रेक द चेन’नुसार अन्न आस्थापनाबाबत उपाययोजनांची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. त्यात उपहारगृहे, हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यगृह पूर्णत: बंद राहतील. मात्र, पार्सल सेवा सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहील. खाद्यपदार्थ विक्रेत्यांना केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शि.बा. कोडगिरे यांनी कळविले आहे.
अन्न पदार्थाची होम डिलिव्हरी सेवा नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत या वेळेत सुरू राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण किंवा आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे आवश्यक आहे.
अटी-शर्तीसह हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यगृह किराणा दुकाने सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत पार्सल सुरू ठेवता येतील. होम डिलिव्हरी व त्यासाठी स्वयंपाकगृह रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा असेल.
सर्व औषध विक्रेत्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून रात्री ८ नंतर व्यवसाय चालू ठेवण्याची मुभा दिली आहे. तथापि, त्यांनी रात्री ८ वाजल्याच्या नंतर केवळ औषध विक्री करावी. रात्री ८ वाजण्याच्या नंतरच्या कालावधीत त्यांनी आइसक्रीम, थंडपेये इत्यादी कोणत्याही अन्न पदार्थाची विक्री करू नये, असेही बजावण्यात आले आहे.