उस्मानाबाद : पोलिस कर्मचार्यांनी कनगरा येथे केलेल्या अमानुष लाठीहल्ला प्रकरणी नांदेड येथील पथकाने रविवारी सात ते आठ तास पीडितांचा जबाब नोंदविला़ उपविभागीय दर्जाच्या काही अधिकार्यांसह जवळपास १० ते १२ जणांचे पथकाने रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदवून घेतल्याचे वृत्त आहे. अवैध दारूविक्री बंद करण्यावरून पोलिस कर्मचारी आणि कनगरा ग्रामस्थांमध्ये २६ मे रोजी हाणामारी झाली होती़ त्यावेळी पोलिस कर्मचारी जखमी झाल्याने उस्मानाबादहून आलेल्या अधिकार्यांसह कर्मचार्यांनी ग्रामस्थांवर अमानुष लाठीहल्ला केला होता़ त्यावेळी घरांचे दरवाजे तोडून अनेकांना घराच्या बाहेर फरफटत आणण्यात आले होते़ या प्रकरणाची दाहकता लक्षात घेता गृह विभागाने बेंबळी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह इतर तीन कर्मचार्यांना तडकाफडकी निलंबित केले होते़ गृहमंत्री आऱआऱपाटील यांनी कनगरा ग्रामस्थांची भेट घेऊन सर्वच दोषी अधिकार्यांसह कर्मचार्यांवर अहवाल आल्यानंतर कठोर कारवाईसह गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे़ दरम्यान, रविवारी नांदेड येथील डीवायएसपी दर्जाच्या काही अधिकार्यांसह १० ते १२ जणांचे पथक दुपारच्या सुमारास कनगरा येथे दाखल झाले होते़ कनगरा ग्रामपंचायतीत संबंधित नागरिकांना वन-टू-वन बोलावून त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात येत होता़ या पथकाने रात्री जवळपास आठ वाजेपर्यंत जबाब नोंदवून घेतल्याचे समजते़ तर जिल्हा पोलिस दलातील कोणत्याही अधिकारी, कर्मचार्याला सोबत न नेता स्थानिक पुढार्यांनाही जबाब नोंदविताना दूर ठेवल्याचे सांगण्यात आले़ दरम्यान, या पथकाने किती जणांचे जबाब नोंदवून घेतले, हे उशिरापर्यंत समजू शकले नाही़ (प्रतिनिधी)
कनगर्यात येऊन नांदेडच्या पथकाने नोंदविले जबाब
By admin | Updated: June 2, 2014 00:52 IST