व्ही.एस. कुलकर्णी , उदगीर देवणी तालुक्यात १० साठवण तलाव, एक मोठा तलाव व तीन किलोमीटर्स अंतरावर भोपणी लघु प्रकल्प असताना या प्रकल्पातून देवणीसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबविण्याऐवजी तब्बल २३ किलोमीटर अंतरावर असलेल्या उदगीर तालुक्यातील देवर्जन मध्यम प्रकल्पातील पाण्याची योजना देवणीसाठी राबविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. परिणामी, देवर्जन ग्रामस्थांतून या प्रक्रियेला विरोध होत असून, हे ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. उदगीर तालुक्यातील देवर्जन मध्यम प्रकल्पातून उदगीर शहरासाठी तातडीची पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. उदगीर नगर परिषदेने १.३४ द.ल.घ.मी. पाणी पिण्यासाठी म्हणून घेतले आहे. १५ जुलै २०१३ पर्यंत ही तात्पुरती पाणीपुरवठा योजना कार्र्यान्वित करण्यात आली होती. मात्र ही योजना आता कायमस्वरूपी झाल्याचे नगर परिषद अभियंत्याचे म्हणणे आहे. त्यामुळे या योजनेचे पाणी एक्स्प्रेस फिडरद्वारे उदगीर शहरासाठी आजही सुरू आहे. शिवाय, या प्रकल्पातून दावणगाव, गंगापूर, वायगाव, भाकसखेडा, हणमंतवाडी व प्रियदर्शिनी साखर कारखान्यासाठी ०.२९००२ द.ल.घ.मी. पाणी आरक्षित करण्यात आले आहे. याशिवाय, देवर्जन, शंभू उमरगा, करवंदी या गावांच्या योजना प्रस्तावीत आहेत. देवर्जन मध्यम प्रकल्प हा शेतकर्यांच्या हितासाठी बांधलेला प्रकल्प आहे. शेतकर्यांच्या हितासाठी ३२ किलोमीटर्स कॅनॉलही सिंचन विभागाने खोदलेले आहे. असे असताना या प्रकल्पातील पाणी देवणीसाठी देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. देवणी तालुक्यात मोठा धनेगावचा बॅरेज आहे. शिवाय, दहा साठवण तलाव, तीन किलोमीटर अंतरावर असलेला भोपणीचा बृहत् लघु प्रकल्प हाही पाण्याने तुडुंब भरलेला आहे. उदगीर नगर परिषदेने भोपणी प्रकल्पातील पाणी आरक्षित केले. २.५० द.ल.घ.मी. पाणी गेल्या १७ महिन्यांपासून बंद आहे. आजघडीला उदगीर शहरासाठी बनशेळकी व देवर्जन या दोनच योजना सुरू आहेत. देवर्जन गावातील पाण्याचे सर्व स्त्रोत आता आटलेले आहेत. शिवाय, या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केले असून, या पाण्याद्वारे अनेक गावांतील ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. तब्बल २३ किलोमीटर्स लांबीची देवणीसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना या प्रकल्पातून राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ते तात्काळ थांबविण्याच्या मागणीसाठी देवर्जन येथील बस्वराज रोडगे, लक्ष्मण बतले, नारायण मिरगे यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने उदगीर येथील उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. देवर्जन गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटलेले आहेत. आमच्या प्रकल्पातील पाणी आमच्या गावाला प्राधान्याने मिळण्यासाठी या प्रकल्पातील पाण्याची कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना आम्ही राबवीत आहोत. आमच्याबरोबरच शेजारच्या शंभू उमरगा व करवंदी गावांनाही पाण्याचा लाभ मिळत असून, त्यांची भटकंती बंद झाली आहे. त्यामुळे देवणीची या प्रकल्पातून राबविण्यात येणारी योजना तात्काळ थांबवावी, असे मत देवर्जनच्या सरपंच शेषाबाई कांबळे यांनी व्यक्त केले.
देवर्जनचे पाणी देवणीला देण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध
By admin | Updated: May 25, 2014 01:11 IST