उमरगा : अनधिकृत नळ कनेक्शनप्रकरणी दोषींवर फौजदारी कार्यवाही करून नुकसान भरपाई म्हणून पाचपट पाणीपट्टी वसूल करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना केल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी बाबूलाल अत्तार यांना नोटीस बजावली आहे. तर अत्तार यांनी या कार्यवाहीस न्यायालयातून स्थगिती मिळविली असल्याचेही सांगण्यात येत आहे. उमरगा नगर परिषदेत अंतर्गत वाद चांगलाच पेटला आहे. दरोरोज काहीतरी नवीन प्रकार समोर येत आहे. परवा अनधिकृत नळ कनेक्शन प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतर याप्रकरणी दोषींवर फौजदारी कारवाई करण्यासोबतच नगर पालिकेची नुकसान भरपाई म्हणून वार्षिक पाणीपट्टीच्या पाचपट रक्कम वसूल करण्याच्या सूचना विद्यमान नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावरून मुख्याधिकाऱ्यांनी बाबूलाल अत्तार यांना नोटीस बजावली असली तरी दुसरीकडे पालिकेच्या कारवाईस न्यायालयाकडून स्थगिती मिळविल्याचे सांगत अत्तार यांनी शहरात पेढे वाटले. त्यामुळे पालिकेतील पदाधिकाऱ्यांना शहर विकासापेक्षा आपसातील वादातच अधिक रस असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. दरम्यान, वाढत चाललेल्या या तणावावर चर्चा करण्यासाठी पालकमंत्र्यांनी मुख्याधिकाऱ्यांना मुंबईला बोलाविल्याची चर्चाही बुधवारी शहरात सुरू होती. (वार्ताहर)नगर परिषदेच्या सन २०१२-१३ च्या आवक-जावक रजीस्टरमध्ये दोन वेगवेगळी नावे असल्याने मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचारी महानंदा स्वामी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिसीच्या उत्तरादाखल त्यांनी दिलेल्या खुलाशामध्ये रज्जाक अत्तार यांनी केलेल्या दमदाटीमुळे आपण ही खोटी नोंद केल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे अत्तार यांच्यासमोर आणखी एक अडचण वाढली आहे.
अत्तार यांच्यावर गुन्हा नोंदवा
By admin | Updated: October 29, 2015 00:18 IST