लातूर : वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह शनिवारी लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला़ अहमदपूर भागात व जळकोट शहरात सुमारे ५ ते ७ मिनिट वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला़ अचानकपणे सुरू झालेल्या पावसाने नागरीकांची एकच धांदल उडाली़ वादळी वाऱ्यासह जिल्हाभरात पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़शुक्रवारी एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा शनिवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाला़ लातूरसह निलंगा, शिरूर अनंतपाळ, रेणापूर, उदगीर, देवणी, चाकूर या सहा तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे़ लातूर तालुक्यातील कव्हा, हरंगुळ बु़या गावासह परिसरात जोरदार पाऊस झाल्याने अांब्याचे मोठे नुकसान झाले़ शिरूर अनंतपाळ तालुक्यात शनिवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे उडाले़ ज्वारीचे उभे पिक भूईसपाट झाले़ केळीच्या बागाही भूईसपाट झाल्या आहे़ जळकोट तालुक्यातील पाटोदा, घोणसी, वांजरवाडा, अतनूर, माळहिप्परगा, जगळपूर या गावातही जोरदार पाऊस झाला़अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली़ चाकूर तालुक्यातही झालेल्या पावसामुळे आंब्याचे नुकसान झाले़ चापोली, आष्टा व वडवळ या गावातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली़ झाडे उन्मळून पडली़ उदगीर, देवणी तालुक्यातही शनिवारी झालेल्या पावसामुळे अनेक गावातील विद्युतपुरवठा खंडित झाल्याने नागरीकांची गैरसोय झाली आहे़लातूर तालुक्यातील काटगाव, जोडजवळा, गाधवड, तांदुळजा, टाकळगाव, वांजरखेडा आदी परिसरात सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला़ या पावसामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकही खोळंबली होती़ (प्रतिनिधी)
जिल्ह्यात पुन्हा अवकाळी
By admin | Updated: April 12, 2015 00:56 IST