औरंगाबाद : पदमपुरा भागातील मनपाच्या व्यापारी संकुल परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते. महापालिकेच्या पथकाने सोमवारी येथील चार टपऱ्या हटवून हा परिसर अतिक्रमणमुक्त केला.
जय टॉवरशेजारी महापालिकेचे व्यापारी संकुल आहे. याठिकाणी दहा ते बारा दुकाने आहेत. याशिवाय या इमारतीत ग्राहक मंचाचे कार्यालयही आहे. मात्र, गेल्या काही दिवसात या इमारतीच्या परिसरात काहींनी अतिक्रमण करुन चार टपऱ्या उभारल्या होत्या. काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी त्याची पाहणीही केली होती. त्यानंतर सोमवारी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या आदेशानुसार येथे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मनपा पथकातील कर्मचाऱ्यांनी येथील चारही टपऱ्या हटवल्या. याशिवाय परिसरात उभ्या असलेल्या गाड्याही हटविण्यात आल्या. ही कारवाई पदनिर्देशित अधिकारी आर. एस. राचतवार, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, सागरश्रेष्ठ तसेच मालमत्ता विभागाचे शेख मोईन यांच्या पथकाने केली.
जनक्रांती सेनेचे मनपासमोर उपोषण
औरंगाबाद : जनक्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या मुख्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. महापालिकेचे माजी क्रीडा अधिकारी बाबासाहेब चव्हाण व त्यांचे सहकारी सदावर्ते यांच्या कामाची चौकशी करा, अशी मागणी या संघटनेने केली आहे. या उपोषणा संदर्भात संघटनेने पालिका प्रशासकांना २० जानेवारी रोजी निवेदन दिले होते. परंतु, त्याची दखल न घेतल्यामुळे उपोषण सुरु करण्यात आले आहे. या निवेदनावर संघटनेचे जिल्हाप्रमुख गणेश कुऱ्हाडे, संजय चव्हाण, मधुकर मघाडे यांची नावे आहेत. पालिकेचे विद्यमान क्रीडा अधिकारी संजयकुमार बालय्या यांच्यावरही संघटनेने आरोप केले आहेत. बालय्या यांना निलंबित करावे, अशी मागणीही उपोषणकर्त्यांनी केली आहे.
लसीकरणाचा दुसरा टप्पा आठवडाभरात
औरंगाबाद : कोरोना काळात पहिल्या फळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण आठवडाभरात सुरु केले जाणार आहे. यासाठी महापालिका लसीकरणासाठीची केंद्रही वाढवणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लस दिली जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. यामध्ये पोलीस, होमगार्ड, सफाई कामगार, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आदींचा समावेश आहे. शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका प्रशासक यांनाही दुसऱ्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी लागेल, असे डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या. किमान पाच केंद्र वाढवावी लागतील व ही केंद्रही दवाखान्यांना जोडली जातील, असे त्यांनी सांगितले.