वाळूज महानगर : वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायत नळजोडणीसाठी भरमसाठ शुल्क आकारत असल्याने शुल्क कमी करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली.
वडगावात नवीन नळजोडणी घेण्यासाठी ग्रामपंचायत प्रत्येकी ५ हजार रुपये अनामत रक्कम नागरिकांकडून घेत आहे. ग्रामपंचायत प्रशासनातर्फे नवीन वसाहतीत अधिकृत नळजोडणीसाठी जनजागृती अभियान राबविले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी नळजोडणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नळजोडणीसाठी ५ हजारांची अनामत रक्कम भरण्याची सक्ती केली जात आहे. गावात बहुतांश गरीब कामगार वास्तव्यास असून कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. भारत निर्माण योजनेअंतर्गत जवळपास ५ कोटी निधीचा खर्च करुनही गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नळजोडणीसाठीच्या अनामत रक्कम कमी करावी, यासाठी नागरिकांनी पंचायत समिती सदस्य सतीश पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. पाटील यांनी ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार करुन नळजोडणी शुल्कात कपात करण्याची मागणी केली. यासंदर्भात पाटील, लक्ष्मण लांडे यांनी गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे यांची भेट घेऊन शुल्क कपात करण्याची मागणी केली.
फोटो ओळ- वडगावातील नळजोडणीसाठी शुल्क कमी करावे, या मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे यांना देताना सतीश पाटील, लक्ष्मण लांडे .
---------------------