अन्यथा तिसऱ्या लाटेत रुग्णसेवा नाही
आयएमए : दरपत्रक लादले, अभ्यासगट करून फेररचनेची मागणी
औरंगाबाद : कोरोना रुग्णांच्या उपचाराचे दरपत्रक हे खासगी रुग्णालयांवर लादण्यात आले. या दरपत्रकात रुग्णालये चालविणे कठीण आहे. दुर्दैवाने तिसरी लाट आली तर या दरानुसार रुग्णालये काम करू शकणार नाहीत. त्यामुळे दरपत्रकाची फेररचना करण्यात यावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए)च्या औरंगाबाद शाखेने केली आहे.
एप्रिल २०२० पासून राज्य शासनाने जारी केलेल्या दरांनुसार रुग्णालये काम करत आहेत. अतिवाढीव आणि न परवडणारी बिले ही मोठ्या आणि कार्पोरेट रुग्णालयांमध्ये होणारी स्थिती आहे. ‘आयएमए’ची रुग्णालये ही नेहमीच योग्य पद्धतीने बिल आकारणी करीत आली आहेत. अतिवाढीव आणि न परवडणारी बिले ही गेल्या २ दशकांपासूनची समस्या आहे. परंतु, या वाढीव बिलांच्या प्रश्नावरून शासकीय दरपत्रक सरसकट जारी करून लहान आणि मध्यम रुग्णालयांवर अन्याय होत आहे, असा आरोप माहिती ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर, सचिव डॉ. यशवंत गाडे यांनी केला.
‘आयएमए’ने काढलेल्या दरपत्रकातील त्रुटी
१) रुग्णालयांवर पडणाऱ्या योग्य आणि एकूण खर्चाच्या अभ्यासात्मक, परीक्षणात्मक असा आधार दरपत्रकाला नाही.
२) कोरोनात उपचार करताना वास्तविक खर्च किती आणि कसा येतो, याचा कुठलाही अभ्यास न करता दरांचे परिपत्रक शासकीय अधिकाऱ्यांमार्फत लादले गेले.
३) कोविड व्यवस्थापन आणि उपचारादरम्यान लागणाऱ्या खर्चात आणि कोविडव्यतिरिक्त उपचारादरम्यान लागणाऱ्या खर्चात प्रचंड फरक आहे. हा फरकच शास्त्रीय दृष्ट्या लक्षात घेतलेला नाही. आरोग्य विम्यावर आधारित दर हे अनाकलनीय आणि चुकीचे व्यवस्थापन आहे.
४) पीपीई किट, मास्क, ऑक्सिजन यांच्या किमती निर्धारित केल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले. परंतु निर्धारित किमतीपेक्षा कितीतरी जास्त खर्च या आणि इतरही विविध गोष्टींवर येत आहे, हा संपूर्ण भार रुग्णालयांवर पडत आहे.
४) व्हेंटिलेटर्स, बाय पॅप, एच. एफ. एन. ओ., अशा वेगवेगळ्या पद्धतीने रुग्णांना ऑक्सिजन द्यावे लागते. या वेगवेगळ्या पद्धतीत किती ऑक्सिजन लागते, याचा देखील विचार हे दरपत्रक ठरवताना केलेला नाही.