औरंगाबाद : तलाठ्यांकडून चुकीचे पंचनामे झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात फेरपंचनाम्यांचे आदेश देण्यात आले होते. आता हे फेरपंचनामे पूर्ण झाले असून त्यानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. या वाढीव क्षेत्राला मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे ३ कोटी रुपयांची जास्तीची मागणी केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये फेबु्रवारीअखेरीस अवकाळी पावसाने थैमान घातले. ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. त्यामध्ये लाखो हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश दिले होते. जिल्ह्यात तलाठ्यांमार्फत पंचनामे झाले. त्यानंतर सरकारकडून पॅकेजही जाहीर झाले. शासनाने हेक्टरी कोरडवाहूसाठी १० हजार, बागायतीसाठी १५ हजार आणि फळपिकांसाठी २५ हजार रुपयांची मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत मंजूर केली. त्यानुसार जिल्ह्याला १०८ कोटी रुपयांची मदत मिळाली. ही रक्कम जिल्हा प्रशासनाला दीड महिन्यापूर्वीच मिळाली. तिचे वाटप जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, सुरुवातीपासून जिल्ह्यात तलाठ्यांकडून योग्य पंचनामे झाले नसल्याचा आरोप होत होता. अनेक ठिकाणी तलाठ्यांनी घरी बसूनच पंचनामे केल्याच्या असंख्य तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने काही भागांमध्ये फेरपंचनाम्यांचे आदेश दिले होते. हे फेरपंचनामे पूर्ण झाले आहेत. या नवीन पंचनाम्यांमुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गंगापूर, औरंगाबाद आणि सोयगाव या तीन तालुक्यांमध्ये हे क्षेत्र वाढले असून त्याला मदत देण्यासाठी आणखी ३ कोटी रुपयांची गरज आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता राज्य सरकारकडे ३ कोटी रुपयांची वाढीव मदत देण्याची मागणी केली आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सांगितले. गंगापूर तालुक्याला हवेत १.५ कोटीफेरपंचनाम्यातील वाढीव क्षेत्राला मदत करण्यासाठी गंगापूर तालुक्यात सर्वाधिक दीड कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यापाठोपाठ औरंगाबाद तालुक्यात १ कोटी रुपये, तर सोयगाव तालुक्यात ५० लाख रुपयांची गरज भासणार आहे.
फेरपंचनाम्यात नुकसानीचे क्षेत्र वाढले
By admin | Updated: June 16, 2014 01:11 IST