औरंगाबाद : बारावे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर परिसरातील विकासकामांच्या ६३ कोटी ४८ लाख ३९ हजार रुपयांच्या प्रस्तावित आराखड्यास पालकमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी मंजुरी दिली. हा विकास आराखड्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी दिली.विभागीय आयुक्त कार्यालयात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री कदम यांच्या उपस्थितीत पर्यटन क्षेत्र विकास आराखड्याची बैठक घेण्यात आली. म्हैसमाळ, वेरूळ, खुलताबाद आणि शूलिभंजन असे पर्यटन सर्किट विकसित केले जाणार आहे. त्याचे पूर्ण नियोजन झाले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने घृष्णेश्वर मंदिर परिसर संरक्षित क्षेत्र, प्रतिबंधित क्षेत्र, नियमित क्षेत्र अशा ३ विभागात विभाजित केला आहे. या भागात पर्यटकांसाठी सार्वजनिक सुविधांचा समावेश असणार आहे. घृष्णेश्वर मंदिरात भाविकांसाठी रांगेची व्यवस्था, पाणी, निवासस्थान, वाहनस्थळ, मंदिरातील विद्युत रोषणाई, आरोग्य केंद्र, स्वच्छता आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे.या आराखड्याला जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीस मंजुरी देण्यात आली असून सरकारकडे हा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असल्याचे डॉ. दांगट यांनी सांगितले.
वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिर परिसर विकास आराखड्यास मान्यता
By admin | Updated: June 21, 2016 01:09 IST