लातूर : लातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असून, त्यामुळे प्रशासन पातळीवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. सांडपाणी अमृत शोष खड्ड्यांत मुरवून विहिरी रिचार्ज करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २२७० अमृत खड्डे घेण्यात आले असून, काही विहिरी अंशत: रिचार्ज झाल्या आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेने अमृत खड्डे तयार करण्याची मोहीम हाती घेतली आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यात ३८४ खड्डे घेतले असून, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. काही विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यांत ही मोहीम राबविण्यात येत आहे. अहमदपूर तालुक्यात १९५, औसा तालुक्यात ४०, देवणी तालुक्यात १४७, रेणापूर तालुक्यात १३९ आणि उदगीर तालुक्यात १२९, लातूर ३७०, निलंगा ५३८ आणि शिरूर अनंतपाळ ३८४ असे एकूण २२७० अमृत खड्डे घेण्यात आले आहेत. ज्या गावांत घनकचरा, सांडपाण्याचे व्यवस्थापन, हागणदारीमुक्त कामे करण्यात आली आहेत, अशा गावांतच अमृत शोष खड्ड्यांची मोहीम राबविण्यात येत आहे. शिरूर अनंतपाळ, तळेगाव, देवणी येथे घेतलेल्या अमृत खड्ड्यांमुळे परिसरातील विहिरींची पाणीपातळी काही प्रमाणात वाढली आहे. केवळ सांडपाणी जमिनीत मुरविल्यामुळे हा दिलासा मिळाला आहे. येणाऱ्या पावसाळ्यातील पाणी जमिनीत मुरविल्यानंतरत्याची सकारात्मकता मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात असे लाखो अमृत शोषखड्डे घेऊन पाणी जमिनीत मुरवून पाणीपातळीत वाढ केली जाणार आहे. (प्रतिनिधी)महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतूून प्रत्येक गावांमध्ये शोषखड्डे घेऊन सांडपाणी जमिनीत मुरविले जात आहे. विहीर, विंधन विहीर परिसरात हे पाणी मुरवून पाणीपातळीत वाढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसत असून, २२७० विहिरींपैकी ५० टक्के विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोरड्या पडलेल्या विहिरींनादेखील झरे फुटले आहेत. शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्यांत हा सकारात्मक परिणाम दिसून आला असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम पटवारी यांनी सांगितले. एक शोषखड्डा घेण्यासाठी साधारणपणे २ हजार रुपये खर्च होतो. सद्य:स्थितीत २२७० खड्डे घेतले असून, त्यावर ४५ कोटी ४० हजार रुपये खर्च झाला असल्याचे त्यांनी सांगितले.६७१०, ३७४ फूट आकारांचे खड्डे खोदून शोषखड्ड्यांच्या विहीत पद्धतीने एका फुटापर्यंत कठीण मुरुम, त्यावर मऊ मुरुम आणि त्यावर मोठ्या आकाराचे दगडगोटे टाकून खड्डे तयार केले जातात. घरातील सांडपाणी पाईपद्वारे शुद्धीकरण करून किंवा गाळ एकत्र करण्यासाठी पात्रात सोडून दिले जाते. या पात्रासाठी, फिल्टर भांड्यासाठी दीड ते तीन फूट व्यासाची सिमेंटची टाकी किंवा दंडगोलाकार सिमेंट पाईप अशी सामुग्री वापरली जाते. टाकीला किंवा रांजणाला छिद्र पाडून पाणी जमिनीत मुरविले जाते. त्याचा हा सकारात्मक परिणाम आहे.
अमृत खड्ड्यांमुळे विहिरी होताहेत रिचार्ज
By admin | Updated: March 21, 2016 00:22 IST