औरंगाबाद : महिला दिनाचे औचित्य साधून मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने महापारेषण कंपनीच्या औरंगाबाद परिमंडळात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या परिमंडळांतर्गत तांत्रिक, अतांत्रिक व कार्यालयीन काम करणाऱ्या महिला कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. त्यांच्या कठोर परिश्रम व उत्कृष्ट सेवेमुळे पारेषण कंपनीचा लौकिक वाढत आहे. त्यांच्या सेवाकार्याचा गौरव करण्याच्या दृष्टीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने परिमंडल सचिव रवींद्र धनवे यांच्यासह संघटना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या परिमंडल उपाध्यक्षा रोहिणी पंडित, महिला प्रतिनिधी अनुपमा जाधव, अर्चना पगारे, करुणा खापर्डे, नमिता दहात आदींसह संघटना पदाधिकारी व महिला कर्मचारी उपस्थित होत्या.