दुग्धव्यवसाय अडचणीत : दुष्काळामुळे उत्पादन घटलेसंदीप अंकलकोटे ल्ल चाकूरशेतीला जोड व्यवसाय म्हणून बहुतांश शेतकरी दुग्धव्यवसाय करीत आहेत़ परंतु, यंदा दुष्काळामुळे मोठे संकट पशूपालकांसमोर उभे राहिले आहे़ त्यातच गतवर्षीच्या तुलनेत यंदा पशूखाद्याचे दर दीडपट झाले असून उत्पादन मात्र मोठ्या प्रमाणात घटले आहे़शहरासह तालुक्यात जवळपास ६० ते ६५ हजार पशूधन संख्या आहेत़ त्यात दुभत्या गाई व म्हशींची संख्या २८ ते ३० हजार आहे़ गेल्या दोन- तीन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने आणि यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने पशूपालकांसमोर पशूधन सांभाळण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे़ दुष्काळामुळे हिरवा चारा तर नाहीच़ पण कडबाही मिळेनासा झाला आहे़ त्यामुळे कडब्याची एक पेंढी २७ रुपयांना विक्री होत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांसह पशूपालक अडचणीत सापडला आहे़दरम्यान, गतवर्षीच्या तुलेनत यंदा पशूखाद्यांच्या दरात दीडपट वाढ झाली आहे़ गतवर्षीचे पशूखाद्यांचे दर व कंसात यंदाचे दर पुढीलप्रमाणे - कडबा ८०० रुपये शेकडा (२७०० रुपये), शेंगदाणा पेंड ४ हजार रुपये क्विं़ (५ हजार २०० रुपये क्विं़), मकाचुनी १५०० रु़ क्विं़ (२१०० रुपये क्विं़), हरभरा चुनी १५०० रु़ क्विं़ (२२०० रु़ क्विं़) असा दर आहे़पशूखाद्यांचे दर दीडपट झाले असले तरी दुधाचा दर मात्र गतवर्षी इतकाच आहे़ म्हैशीच्या दुधाचा दर ३५ ते ४० रुपये लिटर आहे़ दूधडेअरीत विनापाणी दूधाचा दर २८ ते ३२ रुपये आहे़ यंदा दूध उत्पादन काही प्रमाणात घटले असले तरी त्यात सीमा सुरक्षा दल बंद असल्याने तिथे दररोज जाणारे ८०० ते १००० लिटर दूध शिल्लक राहत आहे़ तसेच पॉकेटच्या दुधाचा वापर वाढल्याने शिल्लक दुधाची विक्री कुठे करावी असा सवाल आहे़ फॅट मशीन संशयात़़़ग्रामीण भागात डेअरीत दुधाचा फॅट तपासला जातो़ कितीही शुध्द दूध दिले तरी फॅट ३२ च्या वर लागत नाही़ त्यामुळे प्रतिलिटर ३२ रूपये प्रमाणे भाव मिळत आहे़ फॅट मशीनमध्ये गौडबंगाल असल्याचा संशय दूध उत्पादकांतून व्यक्त केला जात आहे़ दुष्काळी परिस्थितीत पशूधन सांभाळण्यासाठी शासनाने अनुदानावर पशूखाद्य उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी चाकूर येथील शेतकरी समीर पाटील व पंडित मोरे यांनी केली आहे़
पशूखाद्याचे दर झाले दीडपट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 00:12 IST