बीड : तालुक्यातील केसापुरी परभणी येथे सरपणासाठी गेलेल्या ३२ वर्षीय महिलेवर वडवणी तालुक्यातील एका नराधमाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी पुढे आली. दिनकर तुकाराम वाघमारे (रा. साळींबा ता. वडवणी) असे त्या नराधमाचे नाव आहे. त्याला पिंपळनेर पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घटनेबाबत पोलीस म्हणाले, केसापुरी परभणी येथील ३२ वर्षीय महिला गुरुवारी सायंकाळी शेतामध्ये सरपण आणण्यासाठी गेली होती. यावेळी तिला एकटीला पाहून दिनकर वाघमारे याने धमकावत बाजूला नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिला जिवे मारण्याच्या धमक्या देत तेथून धूम ठोकली. त्यानंतर पीडित महिलेने घरी येऊन आपल्या कुटुंबियांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाईक तिला घेऊन पिंपळनेर ठाण्यात दाखल झाले. तिच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी लगेचच दिनकर वाघमारे याच्या मुसक्या आवळल्या. (प्रतिनिधी)
केसापुरी येथे महिलेवर बलात्कार
By admin | Updated: May 24, 2014 01:33 IST