वाळूज महानगर : घरासमोर उभ्या केलेल्या वाहनाला खोडसाळपणाने आग लावण्यात आल्याची घटना रांजणगाव शेणपुंजी येथे घडली. या घटनेत कारसह तीन दुचाकीचे जवळपास एक लाख १५ हजारांचे नुकसान झाले. या प्रकरणी शेजारील महिलेविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.
रवींद्र काशिनाथ कुलकर्णी (रा. शिवनेरी कॉलनी, रांजणगाव) एनआरबी कंपनीत काम करतात. कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि. २६) सायंकाळी कार (एम.एच.२०, डी.व्ही. ७१९४) आणि तीन दुचाकी (एम.एच.२०, ई.एस.२७८६), (एम.एच.२०,डी.एम.५३४३), ( एम.एच.२०, ए.ई.८२८१) ही वाहने घरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमाराला नळाला पाणी आल्याने कुलकर्णी व गल्लीतील नागरिक पाणी भरण्यासाठी जागे झाले. घरासमोर उभ्या वाहनांना आग लागल्याचे दिसताच कुलकर्णी यांनी आरडाओरड केली. आवाजामुळे शेजारील संजय साबळे, बाळशीराम सुंबरे व इतरांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु तोपर्यंत चारही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
खोडसाळपणाने लावली आग
रवींद्र कुलकर्णी यांनी घराशेजारी राहणाऱ्या चांदुबाई राठोड यांच्यावर संशय व्यक्त केला. आग लावण्यापुर्वी चांदुबाईने जुने कपडे वाहनाच्या खाली व आजूबाजूला ठेवले; तर काही कपडे वाहनांवर टाकून जाणीवपूर्वक आग लावल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला. या प्रकरणी संशयित चांदुबाई राठोड (रा. रांजणगाव) हिच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक चेतन ओगले हे तपास करीत आहेत.
फोटो ओळ- रांजणगावात खोडसाळपणाने वाहनाला आग लावल्याने कारसह दुचाकीचे नुकसान झाले.
फोटो क्रमांक- आग १/२
-----------------------