औरंगाबाद : एका दिवसावर राखीपौर्णिमा आली असताना, बाजारात राख्या खरेदीसाठी बहिणींची लगबग सुरू आहे. होलसेल विक्रीसाठी शहरात सुमारे ४ कोटींच्या राख्या आल्या आहेत. या व्यवसायात रविवारपर्यंत किरकोळ विक्रीतून ६ कोटींची उलाढाल होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
शहरात ३०० पेक्षा अधिक दुकाने राख्यांनी सजली आहेत. एका-एका दुकानात विविध प्रकारच्या शेकडो राख्या ठेवण्यात आल्या आहेत. इतरांपेक्षा माझ्या भावाच्या हातातील राखी ‘जरा हटके’ दिसावी, अशी प्रत्येक बहिणीची इच्छा असते. त्यासाठी अनेक दुकानांचा धांडोळा घेत शेकडो डिझाईनमधून आपल्या लाडक्या भाऊरायासाठी राखी पसंत केली जाते. मनपसंत राखी मिळाल्यावर बहिणींचा चेहरा खुलून जाताे. महिलांमधील चोखंदळपणा लक्षात घेऊन अनेक दुकानदारांनी राख्यांची मांडणी मॉलप्रमाणे केली आहे. यामुळे दुकानात फिरून महिला राख्या निवडत आहेत. राखीसोबत भेटवस्तूही खरेदी केली जात आहे. राखी खरेदीसाठी शनिवारी बाजारात मोठी गर्दी राहील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
चौकट
फॅशनेबल राख्या
पूर्वी मोठ्या आकाराच्या राख्या खरेदी केल्या जात असत. पण, आता बारीक, नाजूक, देखण्या राख्यांच्या खरेदीकडे बहिणींचा जास्त कल आहे. नाजूक नक्षीकाम असलेली व रंगीत धागा असलेली राखी मोठ्यांसाठी, तर लहानांसाठी कार्टून कॅरेक्टरच्या राख्या खरेदी केल्या जात आहेत. यात छोटा भीम, स्पायडर मॅन, बॉब द बिल्डर अशा राख्यांचा समावेश आहे.
चौकट
६ कोटीची होते उलाढाल
२० होलसेलर व्यापारी
३०० लहान दुकानदार
१२ ते ६०० रुपये डझनदरम्यान राख्या
१०-१५ टक्क्यांनी वाढले दर
शहरात ६ कोटींच्या उलाढालीची शक्यता
कॅप्शन
दुकानात हजारो राख्यांमधून आपल्या भाऊरायासाठी एक राखी निवडताना बहिणीच्या कल्पकतेची कसोटी लागते.