पाथरी : विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आ़ बाबाजानी दुर्राणी आणि शिवसेनेच्या आ़ मीराताई रेंगे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले़ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश वरपूडकर यांनी पक्षाचे तिकीट न मिळाल्याने काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे़ यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे़ पाथरी विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ६७ उमेदवारांनी ७७ अर्ज घेतले़ २९ उमेदवारांनी ४२ उमेदवारी अर्ज दाखल केले़ शेवटच्या दिवशी तीन अर्ज गेले़ १६ उमेदवारांनी २३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला़ सेलू कॉर्नर परिसरातून रॅली काढत तहसील कार्यालयात अर्ज दाखल केल्यानंतर मार्केट कमिटी यार्डामध्ये जाहीर सभा घेण्यात आली़ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते उपस्थित होते़ शिवसेनेच्या आ़ मीराताई रेंगे यांनी दोन दिवस मुहूर्त साधून वेगवेगळे तीन उमेदवारी अर्ज दाखल केले होते़ तर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शन केले़शहरातील राम मंदिरापासून भव्य रॅली काढून रॅलीचा समारोप तहसील कार्यालयात करण्यात आला़ दोन्ही पक्षाचे शक्तिप्रदर्शन एकाच वेळी असल्याने पाथरी शहरात नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली़ तर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या रॅलीमध्ये फिरत असताना आढळून आले़ (वार्ताहर)
राकाँचे वरपूडकर यांचा काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज
By admin | Updated: September 28, 2014 00:13 IST